कंधार उपविभागीय पोलिस अधिकारीपदी अश्विनी जगताप

लोहा : मागील सहा महिण्यांपासून रिक्त असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदी अश्विनी जगताप यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश मंगळवारी निर्गमित करण्यात आले. यामुळे कंधार उपविभागात अनाधिकृत धंदे, गुन्हेगारी यावर आळा बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मोठे सहकार्य होणार असल्याचे बोलले जात आहे.
कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची मागील सहा महिन्यांपूर्वी बदली झाल्याने हे पद रिक्त होते. नांदेड पोलिस मुख्यालयात पोलिस उप अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी जगताप यांना कंधार उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने दि. २३ जुलै रोजी निर्गमित करण्यात आले.
कंधार उपविभागात लोहा आणि कंधार हे दोन पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक पदांचे तर माळाकोळी आणि उस्माननगर हे दोन पोलिस ठाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी पदांची आहेत. असे एकूण चार पोलिस ठाणे कंधार उपविभागात समाविष्ट आहेत. मात्र सहा महिन्यांपासून उपविभागात पूर्ण वेळ अधिकारी नसल्यामुळे कांहीं ठाणे कार्यक्षेत्रात गुन्हेगारी, अनधिकृत व्यवसाय बळावला असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. मात्र जगताप या नूतन उपविभागीय पोलिस अधिकारी रुजू झाल्यानंतर अवैध धंदे व गुन्हेगारीस आळा बसून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे बोलले जात आहे.