वाळुज हत्याकांड : कपीलची हत्या करण्यासाठी गावठी कट्टा विकणाऱ्याला जालन्यातून अटक
छत्रपती संभाजीनगर : वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये एका हॉटेल व्यावसायीक कपील पिंगळेची हत्या करण्यात करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले होते. या हत्याकांडात वापरलेली गावठी पिस्टल आरोपींना विकणार्याला एमआयडीसी वाळुज पोलिसांनी अटक केली. अमर उर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. सदर बाजार, जालना) असे या आरोपीचे नाव आहे. हा कट्टा खरेदी करण्यासाठी आरोपीकडून तब्बल ५० हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
रांजणगाव शेणपुंजी येथील कपिल सुदाम पिंगळे (३१) या तरुणाचा गुरुवार (दि.१८) मध्यरात्रीच्या सुमारास जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर (२४, रा.बेगमपुरा) याने आपल्या तीन साथीदारच्या मदतीने चाकुने १७ वार करत तसेच गावठी कट्याने गोळी झाडून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी उघडकीस आली होती. या हत्येचा तपास पोलिसांनी सुरू करून मुख्य आरोपी जयेश उर्फ यश फत्तेलष्कर तसेच त्याचे तीन साथीदार भरत किसन पंडुरे (३३, रा.बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (१८) व सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (२३, दोघेही रा.जालना) या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या खुनाचा तपास करताना आरोपीने वापर केलेला गावठी कट्टा कुठून मिळविला याचा शोध पोलीस घेत असताना यात हमलपूर, सदरबाजार परिसरातुन आरोपी अतुल याला अटक केली. अतुल पवार याची जयेश उर्फ यश संजय फत्तेलष्कर याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीतून यश फत्तेलष्कर याने त्याला गावठी कट्टा देण्याची मागणी केली. हा कट्टा आरोपी यश फत्तेलष्कर याने ५० हजार रुपयांमध्ये अतुल पवार याच्याकडून खरेदी केला होता. त्याच कट्ट्याने कपिल पिंगळे याची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
सुपारी देणारा कोण?
याप्रकरणी आरोपी जय फत्तेलष्करला मारण्याची सुपारी कपीलला मिळाल्यामुळे त्याने ही हत्या केल्याचे कबुली दिली होती. परंतु जयेश उर्फ यश फत्तेलष्कर हा सराईत असल्याने तपासात पोलिसांना सहकार्य करत नाही. कपिलची हत्या करण्याची सुपारी देणारा मास्टरमाईंड कोण याचा अद्याप उलगडा झालेला नाही. कपील याचे मारेकरी सराईत गुन्हेगार असून ते तोंड उघडत नसल्यामुळे तपासाला ब्रेक लागला आहे. दुसरीकडे मयत कपिल याने जयेश उर्फ यश यास जिवे मारण्यासाठी कुणाकडून सुपारी घेतली हे गुढ देखील अद्यापही उलगडले नाही.
आरोपींविरूध्द ॲट्रॉसिटी लावण्याची मागणी
हत्येनंतर कपील कुटुंब हे पोलिस आयुक्तालयात येवून या प्रकरणी आरोपींविरूध्द ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.