बदलापूर अत्याचार प्रकरणाने देशात संतापाची लाट
१८ ऑगस्टला पाेलिस न्यूजने दिली होती बातमी

मुंबई : बदलापुरात दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची चिड आणणारी घटना घडली आहे. सात दिवसांपूर्वी ही घटना घडली असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर याप्रकरणी हलगर्जीपणा दाखवलेल्या संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तत्काळ बदली करण्यात आली आहे. तसेच, शाळा प्रशासनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि मुलांची नेआण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांचे निलंबन केले आहे.
या तीन ते साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतच अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. १७ ऑगस्ट राेजी बदलापूर पोलिसांनी इतक्या संवेदनशील प्रकरणात तब्बल १२ तासांनंतर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटूंबासोबत पोलिस ठाण्यात येत पोलिसांना याची माहिती देत हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी पीडित कुटूंबासोबत मध्यरात्रीपर्यंत थांबल्यावर पोलिसांना शाळेतील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करावा लागला आहे.
शाळेतील हा नराधम पीडितांचे शोषण करत होता. त्यातील एका चिमुरडीने आपल्या आईकडे गुप्तांगात त्रास होत असल्याची तक्रार केली. जेव्हा डॉक्टरांनी या चिमुरडीला तपासले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. तर, आपल्या अवघ्या साडेवर्षांच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून आता या घटनेची अखेर दखल घेण्यात आली आहे.
याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याबद्दल सांगण्यात आलं आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच…
— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) August 19, 2024
जयेश वाणी यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका 3 वर्षे 8 महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.
या घटनेचे पडसाद बदलापुरात उमटताना दिसत आहेत. ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळेसमोर शेकडो पालकांचा जत्था लोटला आणि जोरदार आंदोलन करण्यात आलं. तसेच, बदलापूर रेल्वे स्थानकात लोकांनी रेल्वे रुळावर आंदोलन करण्यात सुरुवात केली असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही असं सांगितलं. तसेच, आज बदलापुरात कडकडीत बंद पाळला जात आहे. रिक्षा, दुकानं बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बदलापुरात तणाव वाढताना दिसत आहे.
भाजपाचा कार्यकर्ता असला तरी विनाविलंब त्याच्याविरुद्ध कारवाई झाली पाहिजे : उद्धव ठाकरे
“बदलापूरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. या घटना देशभरात वारंवार घडतात. ठराविक राज्यातील ठराविक घटनांचं राजकारण केलं जातं. आज संजय राऊत यांना सामनाच्या अग्रलेखातही लिहिलं आहे. एका बाजूने आपण राज्यात लाडकी बहीण योजना आणत असतानाच आपल्या राज्यात या लाडक्या बहिणीच नाही त्यांच्या छोट्या छोट्या मुलीही असुरक्षित आहेत. त्यांच्यावर अत्याचार होत आहेत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे. “देशात कुठेही अशी घटना घडता कमा नये. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरोधात लवकरात लवकर खटला चालवावा. मग ते फास्ट ट्रॅक कोर्ट असो किंवा इतर माध्यमातून असो,” असंही उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.