क्राइम

२० महिन्यात दाम दुपटीने आमिष ; २० जणांना १ कोटी २८ लाखांचा गंडा

समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास २० महिन्यात दाम दुप्पट परतावा आणि मूळ गुंतवणुकीवर प्रतिमाह १० टक्के व्याज असे आमिष दाखवून पाच भामट्यांनी २० जणांना तब्बल १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा चुना लावून पोबारा केला. हा प्रकार २२ जुलै २०२२ ते १६ मे २०२३ या काळात मिटमिटा भागातील समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयात घडली. नरेंद्र बाळू पवार, शुभांगी पवार (दोघेही रा. मालेगाव, जि. नाशिक), प्रफुल कांबळे, स्वप्नील ठाकरे आणि संदीप मुळे (तिघेही रा. पुणे) अशी फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश मनसुबराव हिवार्डे (३८, रा. जिकठाण, ता. गंगापूर) हे वाहन चालक आहेत. त्यांना २०२२ मध्ये समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्यांच्या गावातील मित्र संतोष थोरात याला सोबत घेऊन आरोपी नरेंद्र पवार याच्या समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीच्या मिटमिटा येथील कार्यालयात गेले. तिथे पवार याने आमच्या कंपनीत बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केली असून त्यांना चांगला परतावा देत आहोत. तुमची गुंतवणूक आम्ही २० महिन्यात दुप्पट करून देतो. तसेच मूळ गुंतवणुकीवर दरमहा १० टक्के व्याज देखील देतो असे आमिष दाखविले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुणे येथील वाघोली भागात सेमिनारसाठी पवार याने हिवार्डे यांच्यासह थोरात या दोघांना निमंत्रित केले. तिथे नरेंद्र पवार, प्रफुल कांबळे, शुभांगी पवार, स्वप्नील ठाकरे, संदीप मुळे हे सर्वजण मिळून सेमिनारमध्ये आलेल्या सर्वाना समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीत पैशाची गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करत होते. तसेच गुंतवणुक केल्यास फॉरेन ट्रिप, सोने देण्याचे आमिष दाखवित होते. सेमिनार नंतर बऱ्याच लोकांनी गुंतवणूक केल्याचे पाहून हिवार्डे आणि थोरात याना त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर मिटमिटा येथे कंपनीत गुंतवणुक करण्याचे ठरविल्याने २२ जुलै २०२२ रोजी हिवार्डे यांनी त्यांच्या बँक खात्यातून समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीच्या बँक खात्यात ४ लाख ८० हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. मात्र, बरेच दिवस झाले तरी काहीच परतावा मिळत नसल्याने त्यांनी पवार याला फोन केला तर तो बंद होता. त्याच्या मिटमिटा येथील कार्यालयात गेले तर त्याला देखील कुलूप होते. पवारसह आरोपींचा शोध घेतला तरी ते काही याना सापडले नाही. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख करत आहेत.

जिकठाण गावातील लोकांसह २० जणांना गंडविले
हिवार्डे यांच्यासह त्यांच्या गावातील आणि अन्य काही अशा २० लोकांना पवार आणि त्याच्या चार साथीदारांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये ऋषिकेश हिवर्डे यांचे ६ लाख २४ हजार, नामदेव झळके यांचे ३ लाख ४८ हजार, शिवराम रोकडे यांचे १ लाख ९१ हजार, एकनाथ भरोसे यांचे २ लाख १७ हजार, हरिभाऊ कांडे यांचे ४ लाख ६२ हजार, अनिकेत जाधव यांचे ३ लाख २८ हजार, प्रभाकर अडसुळे यांचे ५ लाख ३८ हजार, मनोज चापे यांचे ५ लाख ३३ हजार, हरीश पाटील यांचे ३ लाख २८ हजार, शिवाजी गाडेकर यांचे ३ लाख २८ हजार, बाळू लांडे यांचे ३७ लाख ६० हजार, ईश्वर तोडकर यांचे ५ लाख ८८ हजार, किरण तोडकर यांचे २ लाख, गणेश बोडखे यांचे ३ लाख ७० हजार, संतोष थोरात यांचे ९ लाख ७० हजार, परशुराम साबळे यांचे ३ लाख, रामेश्वर रोकडे यांचे १० लाख २५ हजार, सोमीनाथ डोंगरे यांचे ८२ हजार, संदीप जाधव यांचे ४ लाख, सचिन जाधव यांचे ८ लाख असे एकूण १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपये घेऊन नरेंद्र पवारसह आरोपींनी पोबारा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button