शिक्षिका व विद्यार्थ्याने चिडवले म्हणून आठवीतल्या मुलाची आत्महत्या, कल्याणमधील घटना
संतोष दिवाडकर : कल्याण
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरातील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून मृतकाच्या जवळ त्यांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने एका शिक्षिकेसह विद्यार्थ्याचे नाव लिहून ठेवले होते.
विघ्नेश प्रमोदकुमार पात्रा असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आई वडीलांसह राहत होता. तसेच त्याला एक बहीण देखील आहे. रविवारी सायंकाळी घरी कोणी नसताना त्याने एक सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. एका शिक्षिकीने व विद्यार्थ्याने मला चिडवल्याने आत्महत्या करीत असल्याचे या नोटमध्ये लिहण्यात आले आहे. मात्र त्याच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
अलिकडल्या काळात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी मानसिक तणावातून आत्महत्या केली जाते हे प्रमुख कारण मानले जाते. यामध्ये अल्पवयीन मुलांचा देखील तितकाच समावेश होतो. यामध्ये आत्महत्या करण्यामागे काही गंभीर कारणे असतात तर काही प्रकरणात शुल्लक कारणाने आपले जीवन संपवल्याचे देखील समोर येते. त्यामुळे अशा विषयांवर शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे बनले आहे असे दिसते. त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांच्या मनातील भावना जाणून घ्यायला हव्यात ही काळाची गरज बनू लागली आहे.