तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; भाईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : सध्या तलवार चाकूने केक कापून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच प्रकारे राजाबाजार भागात एका ठेकेदाराने भररस्त्यावर जंगी वाढदिवसाचा कार्यक्रम घेत तलवारीने केक कापल्यानंतर हातात तलवार घेऊन हवेत फिरवत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याची माहिती मिळताच शहर सहायक पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ठेकेदाराला बेड्या ठोकल्या. ही कारवाई १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास राजाबाजार भागात करण्यात आली. संजय दत्तात्रय महारगुडे (३५, रा. राजाबाजार, कुंवारफल्ली) असे आरोपीचे नाव आहे.
३१ जुलै रोजी महारगुडे याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तलवार आणि चाकूने केक कापला. त्यानंतर मित्रांच्या खांद्यावर बसून तलवार नाचत गाण्यावर ठेका धरला. याचा व्हिडीओ त्याने इन्स्ट्राग्रामवर अपलोड केला. काही तरुणांनी या भाईच्या वाढदिवसानिमित्त बाईक रॅली देखील काढली होती. मात्र, याच भाईला आता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याने थेट जेलची हवा खावी लागली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक निवृत्ती गायके, नितीश घोडके, आनंद वाघूळ, गजानन शेळके यांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी चाकू आणि तलवार जप्त करून महारगुडेला अटक करून सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल केला.