क्राइम स्टोरी

Crime Story : शेअर बाजारात फसला, पैशासाठी वृध्देला केले ठार ! गैरमार्गावर चालतांना यशची सगळीकडेच झाली हार!

डोंबिवली : अलिकडचा काळ हा स्वार्थाने पछाडलेला आहे. पैशाभोवती जग फिरू लागले आहे. पैसा कमावला तर सगळी सुख मिळतात असे मानले जाते. पैसा कमावण्यासाठी काहीही करणे गैर मानले जात आहे. एखाद्याचा जीव घ्या, पण पैसे मिळवा इतका नीच आजच्या पिढीचा फंडा झाला आहे. झटपट पैशासाठी शेअरबाजार, जुगार, बनवेगिरी, फसवणूक, भेसळ, अफरातफर करण्याची अनेकांची तयारी असते. एखाद्याचा खून करण्यासही काही लोक तयार होतात, पण या सगळ्याने कोणतेच सुख लाभत नाही, तर हातात बेड्याच पडतात हे अनेकदा सिध्द झाले आहे. पालघर जिल्ह्यात भरपूर पैसे मिळवण्यासाठी एक तरूण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू लागला, पण नफा राहिला बाजूलाच हातात होते ते पैसेही तो गमावून बसला. नंतर कर्जबाजारी झाला. या कर्जासाठी देणेकरी तगादा लावू लागले होते, तेंव्हा त्याने एका वृध्देचा खून करून तिची कर्णफुले आणि गळ्यातील माळ चोरून नेली. त्यातील कर्णफुले सोन्याची होती मात्र माळ नकली होती. कर्णफुले विकून त्याला हातात काही येण्याआधीच त्याच्या हातात बेड्या पडल्या.

पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम या ठिकाणी दीपा दिगंबर मोरे या त्यांचे पती दिगंबर मोरे, मुलगी सुनिता आणि मुलगा संदेश यांच्यासह गेल्या सहा महिन्यापासून भाडेतत्त्वावर रहायला आहेत. त्यांचे पती एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरीला आहेत, यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलीचे लग्न झाले असून ती तिच्या सासरी संसार करत आहे.

दीपा यांचे वडील अरविंद काशिनाथ रायकर यांचे निधन झाले आहे. त्यांना आशा अरविंद रायकर (वय ६२) आणि सुनिता अरविंद रायकर अशा दोन पत्नी होत्या. पहिली पत्नी आशा यांना एकुलती एक कन्या झाली ती दीपा, तर दुसरी पत्नी सुनिता। यांना मुलगा दीपक अरबिंद रायकर (पूर्वी रहाणार घरडा सर्कल आजदेगाव डोंबिवली पूर्व सध्या रा. घाटकोपर) आणि मुलगी ज्योती अरविंद रायकर अशी दोन अपत्ये आहेत. सुनिता रायकर यांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. तर सन २०१७ मध्ये आशा रायकर या कामगार हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणाहून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या डोंबिवली मधील रूम नंबर १०६, पहिला मजला, वसंत निवास, शास्त्रीनगर डोंबिवली पश्चिम या ठिकाणी एकट्याच भाड्याच्या खोलीत रहात होत्या. त्यांच्याशी त्यांची मुलगी दीपाचा फोनद्वारे नेहमीच संपर्क होता. दोघी रोजच बोलत असत आणि ख्याली खुशाली विचारत असल्यामुळे त्यांना त्या जवळच रहात असल्यासारखे भासत होते.शुक्रवार दि. १४ जून २०२४ रोजी सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे दीपा या उठल्या होत्या. त्या जेवणाचा डबा बनवत असतांना साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आईच्या डोंबिवलीवरून कॉल आला.

इतक्या सकाळी आईचा कॉल आल्याने त्यांनी तो पटकन उचलला, पण तिकडून त्यांची आई नव्हे तर दुसरेच कोणीतरी बोलत होते. त्यांनी सांगितले की, ‘मी शेजारी रहाणारी रश्मी नावाची महिला असून तुमची आई घरात बेडवर पडलेली आहे, तिच्या नाका-तोंडाजवळ रक्त साचले आहे, तरी तुम्ही ताबडतोब निघून या.’ हे ऐकताच दीपा खूप घाबरून गेल्या. ताबडतोब त्या पती, मुलगा, मुलगी व जावई यांच्यासह घरातून बाहेर पडल्या. ते ताबडतोब डोंबिवली येथे सकाळी ११ वाजेपर्यंत पोहोचले.

इकडे कोणीतरी दक्ष नागरिकाने व विष्णूनगर पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली असता वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनास्थळाची व जखमी महिलेच्या देहाची पहाणी केली असता त्याठिकाणी पोलिसांना वृद्ध महिलेजवळ तिच्या बेडच्या बाजूला ती जमिनीवर टाईल्सवर डाव्या अंगावर ती पडलेली दिसली. तिच्या तोंडाजवळ रक्त साचलेले दिसले. तसेच तिच्या पायालगतं नाडी पडलेली दिसली. तिच्या गळ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. पोलिसांनी तात्काळ घरात पडलेल्या आशा यांना उचलून अॅम्ब्युलन्समध्ये टाकले. त्यांना शास्त्रीनगर रूग्णालय डोंबिवली येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

विष्णूनगर पोलिसांना घटनास्थळी कुठलाही पुरावा अथवा धागा-दोग आढळून आला नव्हता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत वृध्देचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे अहवालात नमूद केले होते. पोलिसांनी तिथा खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असाचा असा अंदाज काढत त्यादृष्टीने तपास आरंभला. त्यांनी त्या इमारतीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या – सर्वांच्या नोंदी तसेच सर्व सी.सी. टी.व्ही. फुटेज आणि आजूबाजूच्या बिल्डिंगजवळील सी.सी.टी.व्ही. फुटेजही तपासण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्या बिल्डिंगमधील एक तरूण पोलिसांना स्वतःहून मदत करतांना आढळला आणि पोलिसांचा संशय त्याच्यावर गेला. परंतु पोलिसांनी तसे भासू दिले नाही. त्या तरूणाला वाटत होते की पोलिसांचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा संशय नाही, परंतु मनातून ने तो खूप घाबरलेला होता. घटना पडून अवघे काही तास झाले होते. पोलीस योग्य पद्धतीने तपास करत होते. फुटेजच्या माध्यमातून एक तरूण त्या महिलेच्या घरामध्ये जातांना व येतांना दिसत होता आणि तोच तरूण पोलिसांना मदत करत होता. पोलिसांनी त्या तरूणावर लक्ष केंद्रित केले. त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि तो नंबर सर्जिंगसाठी टाकला. तो कुणा-कुणाशी आणि काय-काय बोलतो याचा तपास पोलिसांना करायचा होता. पोलिसांनी संशयावरून यश सतिश विचारे (वय २७, रहाणार वसंत निवास, डोंबिवली पश्चिम) यास – चौकशीसाठी ताब्यात घेतले. मग मात्र तो गोंधळून गेला. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली – असता त्याने अधिक आढेवेढे न घेता गुन्हा कबूल केला.

पोलीस सूत्रानुसार यश हा मुंबईतील एका कंपनीमध्ये कामाला आहे. त्याचा एक भाऊ अमेरिकेमध्ये नोकरीला आहे. यश अविवाहित असून सहा महिन्यापूर्वी त्याला शेअर मार्केटचा छंद लागला. या शेअर मार्केटमध्ये त्याचे पत्रास ते साठ हजार रूपये गेले. त्याच्यावर ६० हजार रूपयाचे कर्ज झाले होते. त्याने ते व्याजाने घेतलेले होते आणि ज्यांच्याकडून घेतले होते. ते पैशासाठी तगादा लावत होते. आता काय करावे? हे त्याला काही सुचत नव्हते. त्याचे वित्त धाऱ्यावर नव्हते. त्यादिवशी त्याच्या बिल्डिंगमधून तो घरी जात होता, तेव्हा त्याला त्या लिफ्टमध्ये एक वृध्द महिला अर्थात आशा अरविंद रायकर (वय ६२) या दिसल्या. त्यांच्या गळ्यात एक सोन्याची माळ व कर्णफुले होती. ते पाहून त्याला वाटले की, हे . कर्णफुले व माळ आपण घेतली तर आपले कर्ज फिटून जाईल. त त्याच्या मनात हा विचार सुरू असतांनाच लिफ्ट थांबली. त्यातून त्या आजी उतरल्या. त्याचक्षणी त्यांच्या पाठोपाठ यशही बाहेर ‘आला. आशा त्यांच्या घराजवळ गेल्या असता त्यांच्या पाठोपाठ यश आला आणि म्हणाला की, ‘आजीबाई मला थोडे प्यायला पाणी देता का?’ तेंव्हा त्या म्हणाल्या, ‘ठीक आहे, ये घरामध्ये तुला पाणी देते’ असे म्हणून त्या घरात गेल्या. त्यांच्या पाठोपाठ यश घरात घुसला आणि त्याने पटकन दरवाजा बंद केला. त्या आजीबाईच्या गळ्यात हात टाकून त्यांची सोन्याची माळ घ्यायचा प्रयत्न केला. अचानक उद्भवलेल्या या प्रकाराने त्या आरडाओरड करू लागल्या. त्याच्या आवाजाने आपले बिंग फुटले या भीतीने त्याने आजूबाजूला नजर टाकली. एक नाडी त्याच्या नजरेस पडली, त्याने ती नाडी उचलली आणि आशा यांच्या गळ्याभोवती गुंडाळली. त्यांना खाली पाडले आणि तो नाडीने गळा आवळू लागला. थोड्याच वेळात आशा यांची झटपट थांबली. त्या शांत झाल्या. या झटपटीत त्यांच्या नाकातून व डोक्यातून जखमेमुळे रक्त वाहू लागले होते.

यशने याचा काही एक विचार न करता त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व कर्णफुले काढून घेतली. तो घरातून बाहेर पडला आणि दरवाजा ओढून बाहेरून कडी लावून घेतली त्यानंतर तो पळून गेला.मयत आशा व संशयित आरोपी. यश हे दोघेही एकाच बिल्डिंगमध्ये रहात असल्याने आपल्याला कोणी संशय घेणारनाही असे. यशला वाटले होते, परंतु पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. विशेष म्हणजे त्याने घटना घडली त्यादिवशी कर्णफुले व माळ विकण्यासाठी त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावले. त्याला सांगितले, ‘हे मी माझ्या मित्राच्या आईचे दागिने आणले आहेत, हे विकून मला एका जणाचे पैसे द्यायचे आहेत.’ त्याने त्याच्या मित्राच्या ओळखीचा एक सोनार गाठला आणि त्या सोनाराला ते दागिने दिले, पण त्यातील कर्णफुले सोन्याची होती तर गळ्यात घातलेली माळ नकली असल्याचे स्पष्ट झाले आणि यशने डोक्याला हातच मारून घेतला. परंतु तो आता काही करू शकत नव्हता. त्याच्या हातून गुन्हां घडला होता. तो त्या रात्री एका बियर बारमध्ये जाऊन खूप दारू प्यायला. रात्री अडीच वाजता त्यानेएका मित्राला फोन केला आणि म्हणाला की, ‘चल आपण दारू प्यायला जाऊ या, कल हो सकता है अंदर जाना पडेगा’ त्याच्या बोलण्याचा उलगडा न झाल्याने त्याचा मित्र आला, त्यानंतर ते दोघे जण उल्हासनगर येथे दारू प्यायला गेले. पोलिसांनी त्याच्या मोबाईल रेकॉर्डवरून त्याने कुणा-कुणाला कॉल केले. या सर्वांची चौकशी केली असता त्या मित्राने सांगितले की. रात्री आम्ही दारू प्यायला गेलो होतो, पण दारूपिण्याअगोदर यश म्हणाला होता की चल आज खूब दारू पिते है। कल हो सके अंदर – जाना पडेगा। या एका वाक्यावरूनच पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले व एक खुनाचा गुन्हा उघड झाला.

घटनास्थळाचा व मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी केला व विष्णुनगर – पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर व – ६११/२०२४ भारतीय दंड विधान – कायदा कलम ३०२,४५२,४९९, प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही घटना ३ जून रोजी घडली व १४ जून रोजी उघडकीस आली. ती अशी की, दि. १३ जून रोजी संध्याकाळी यशने आशा यांचा खून करून बाहेरून कडी लावून घेतली. त्यांच्या शेजारी एक महिला रहायला आहेत. त्यासुद्धा वृद्ध असल्याने त्या दोघी जणी एका ठिकाणी जेवण करत असंत व चहा पित असत, मात्र त्यादिवशी त्यांना आशा यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद दिसला. चार-पाच वेळेस त्यांनी बघितला असता त्यांना वाटले की त्या काही कामानिमित्त खाली गेल्या असतील येतील केंव्हा तरी, परंतु त्या रात्री उशिरापर्यंत आल्याच नाही. सकाळी उठल्यानंतर त्या महिलेने बाहेर जाऊन बघितले असता तेंव्हाही दरवाजाला कडीच लावली होती. मग त्यांना संशय आला, त्यांनी दरवाजाची कडी उघडली. आत पाहिले असता आशा रायकर या जमिनीवर पडलेल्या त्यांना दिसल्या त्यांनी याबाबत आशा यांची मुलगी दीपाला माहिती कळवली.

याप्रकरणी संशयित आरोपी यश विचारे याला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता त्यास सुरूवातीला १८ जूनपर्यंत व नंतर पुन्हा दोन दिवस वाढवून २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी दरम्यान त्याने गुन्ह्याची हकीकत पोलिसांना सांगितली. संशयित यश विचारे यास आई आहे, त्याचे वडील वारलेले आहेत. या गुन्ह्यासंदर्भात कल्याणपरिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे ए.सी.पी. सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर पोलीस ठाण्याचे कर्तबगार वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी स्वतः खुनाच्या गुन्हयाचा तपास हाती घेतला. संशयित आरोपी. यश विचारे यास अटक केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक – दीपविजय भवर, ए.एस.आय. – संगप्पा भुजबळ, संजय देशमुख, पोलीस हवालदार शकील जमादार, विक्रम गवळी, राजेंद्र पाटणकर, नितीन भोसले, शंकर मोरे, राजेश पाटील, युवराज तायडे, पोलीस नाईक शालिग्राम भोई, पोलीस कॉन्स्टेबल शंकर साबळे, शशिकांत रायसिंग यांनी परिश्रम घेतले असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button