
नवी दिल्ली : भारताची आघाडीची कुस्तीपटू साक्षी मलिकने विटनेस हे आत्मचरित्राचे प्रकाशित केले आहे. यात तिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. साक्षी मलिक ही रियो ऑलिम्पिक (२०१६) मध्ये पदक जिंकणारी कुस्तीपटू आहे तिने काही महिन्यांपूर्वीच कुस्तीला अलविदा केले होते.
साक्षी मलिकने आपल्या पुस्तकातून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. २०१२ साली कझाकस्तानमधील अल्माटी येथे भरलेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेदरम्यान ब्रिजभूषण सिंह यांनी हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीत बोलावून विनयभंग केला, असा आरोप साक्षी मलिकने आपल्या पुस्तकात केला आहे.
आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेत २०१२ साली साक्षी मलिक कझाकस्तानला गेली होती. तेव्हा साक्षी २० वर्षांची होती. स्पर्धेत चांगल खेळ केल्यानंतर रात्री ब्रिजभूषण सिंह यांनी साक्षी मलिकला आपल्या खोलीत बोलावून घेतले आणि तिच्या पालकांना फोन लावून दिला होता. पालकांशी फोनवर बोलल्यानंतर त्यांनी माझा विनयभंग केला, असे साक्षीने आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
सिंह यांनी माझ्या पालकांना फोन लावून दिला होता. त्यावेळी त्यात काही वावगे वाटले नाही. मी माझ्या पालकांशी फोनवर बोलत होती, त्यादिवशी मी कसा खेळ केला आणि पदक जिंकले, याची माहिती देत होते. पण फोन ठेवताक्षणी सिंह यांनी त्यांच्या बेडवर माझा विनयभंग केला.
मी त्यांना धक्का दिला आणि रडायला लागले, असेही साक्षीने आपल्या पुस्ताकात म्हटले पुस्तकात आहे. मी प्रतिक्रिया केल्यानंतर सिंह मागे हटले. त्यांना जे काही हवे आहे, त्यासाठी मी तयार नसल्याचे त्यांना कळले. त्यानंतर मात्र त्यांनी मी तुझ्या वडिलांसारखा आहे, असे म्हटले. पण माहीत होते, ते जसे म्हणत होते, तशी परिस्थिती त्या खोलीत नक्कीच नव्हती. मी रडत रडतच त्यांच्या खोलीतून पळत माझ्या रुमवर गेले.
साक्षी मलिकने तिच्या लहानपणी लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला असल्याचे म्हटले आहे. लहानपणी खासगी शिकवणुकीतील शिक्षकाने विनयभंग केल्याची आठवण साक्षीने सांगितली. मला लहानपणीही विनयभंगाचा सामना करावा लागला होता. पण मी कुटुंबियांना याबद्दल सांगू शकले नाही, कारण मला वाटायचे ही माझीच चूक आहे. माझे ट्यूशनमधील शिक्षक माझा छळ करायचे. शिकवणुकीला इतर कुणी नसताना ते मला बोलावून घ्यायचे आणि इथे तिथे हात लावायचे. त्यामुळे मला त्यांच्या घरी जायलाही भीती वाटत होती. पण मी माझ्या आईला हे कधीच सांगू शकले नाही, असेही साक्षीने पुस्तकात लिहिले आहे.