निवडणूक कालावधीत शांतता- सुव्यवस्थेस प्राधान्य – पो.नि. भीमराया खणदाळे

सांगोला : प्रतिनिधी
निवडणूक म्हणजे लोकशाहीतील अनोखा उत्सव असून सर्वांगीण विकासासाठी मतदान अत्यावश्यक आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी केली असून, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीसांची सर्वत्र करडी नजर आहे.
जर कोणी निवडणूक कालावधीत बेशिस्तपणा केला तर कोणाचीही गय केली जाणार नाही. तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था यालाच प्राधान्य असल्याचे पोलीस निरीक्षक भीमराया खणदाळे यांनी ‘पोलीस न्यूज ‘ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
निवडणूक कालावधीत लोकांना निर्भयपणे मतदान करता यावे म्हणून, ग्रामीण भागातील प्रत्येक वाडी- वस्तीवर घडणाऱ्या घटनांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. निवडणूक प्रशासनातील सर्व विभागाशी समन्वय साधत पोलीस काम करत आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. राजकीय दृष्टीने महत्वाच्या गावातही पोलीस लक्ष ठेवत आहे.
मतदारांना निर्भयपणे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन ‘मतदान’ करता यावे, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, असे सांगोला पोलीस स्टेशनचे पो. नि. भीमराया खणदाळे यांनी शेवटी सांगितले.