महाराष्ट्र
एसईबीसी आरक्षणामुळे रखडलेला सेट परीक्षेचा निकाल जाहीर करा
शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र सेट परीक्षेचा एसईबीसी आरक्षणामुळे रखडलेला निकाल जाहीर करण्याची मागणी सेट परीक्षार्थींच्या वतीने अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात नमूद आहे की , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी 39 व्या सेट परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरीता 17 शहरातील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते. या परीक्षेसाठी यंदा 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते. प्रत्यक्ष निकाल तयार करण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागाच्या वतीने पूर्णत्वास आले असून राज्य शासनाने लागू केलेल्या एसईबीसी आरक्षणाचा अंतर्भाव करून निकाल जाहीर करायचा का ? याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. परंतु अजूनही राज्य शासनाकडून विद्यापीठाला कुठलेही मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. त्यामुळे 100 दिवसाच्या वर होऊनही अजूनही सेट परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.
अनेक विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत आणि जर वेळेत महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल लागला नाही तर अनेक विद्यार्थी या पदापासून वंचित राहतील. विद्यार्थ्यांकडून सेट परीक्षेचा निकाल लावण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू आहेत परंतु अद्याप शासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्वरित सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी सेट परिक्षार्थी प्रदीप पट्टेबहादूर आणि युवराज राठोड यांनी अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.