क्राइममहाराष्ट्र
पैश्याचा वाद; व्यावसायिक भागीदारानेच केला ‘घात’
१५ महिन्यानंतर खुनाचा उलगडा ; जयशिंगपूर येथील एकास अटक
सांगोला : प्रतिनिधी
दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी रात्री नाझरा मठ -राजुरी रोडवरील कुटे मळयाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्या लगत नाला बंडींग बांधाच्या चारीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता, सदर प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलीसांना यश आले असून खून झालेल्या व्यक्तीचा व्यावसायिक भागीदार असलेल्या एकानेच ‘घात’ करत खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर खुनाचा उलगडा १५ महिन्यानंतर झाला असून याप्रकरणी विशाल दत्तात्रय बनसोडे (वय ३६) रा. सावित्रीबाई फुले हौसींग सोसायटी, नांदणी रोड, जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर रमन सातप्पा साबळे (वय ३६ ) रा.लक्ष्मी पेठ, देगाव रोड, सोलापुर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे अनकढाळ गावाचे शिवारात नाझरा मठ ते राजुरी रोडवरील कुटे मळयाकडे जाणारे कच्च्या रस्त्या लगत नाला बंडींग बांधाच्या चारीत अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणावरून जिवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतुन पेटवुन देऊन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून दिनांक १४ एप्रिल २०२३ रोजी सांगोला पोलीस ठाणे येथे गु.र .नं. ३२६/२०२३ भा.द.वि. कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा विक्रांत गायकवाड हे करत आहेत. सदर बाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापुर शहर येथे यातील मयताच्या वर्णनाचा इसम मिसींग झाल्याबाबत मि. क्र. ३६/२०२३ दिनांक ११ एप्रिल २०२३ प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सोलापुर शहर कडील करीत होते.
त्याप्रमाणे सदर हरवलेली व्यक्ती रमन सातप्पा साबळे याच्या मिसींग बाबत समांतर तपास करीत असताना, त्याचा खुन मिसींग व्यक्तीचा व्यावसायिक भागीदार असलेला विशाल दत्तात्रय बनसोडे याने केल्याची माहिती मिळाली. त्यास कोल्हापुर येथून पोलीसांनी ताब्यात घेऊन हरवलेल्या व्यक्तीबाबत सखोल चौकशी केली असता, विशाल बनसोडे यानेच दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी रात्री अनकढाळ टोल नाक्याजवळ त्या दोघांमध्ये पैशाचे देवाण- घेवाणीच्या कारणावरून वाद झाला. म्हणून रमन सातप्पा साबळे यास मारहाण करुन गळा दाबून खून केला. त्यानंतर पेट्रोल व डिझेल आणून मयत रमन साबळे याच्या शरीरावर टाकुन त्याची ओळखु होऊ नये , याकरीता जाळून टाकले असल्याची माहिती दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीस ठाणेच्या अभिलेखावर अज्ञात आरोपीविरुध्द खुन करुन पुरावा नाहीसा केल्याचा गंभीर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी विशाल बनसोडे यास स.पो.नि. संदीप पाटिल (गुन्हे शाखा सोलापुर) व त्यांच्या कडील तपास पथकाने सांगोला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर केल्याने त्यास सांगोला पोलीस ठाणे कडील गु र नं ३२६/२०२३ भादवि कलम ३०२, २०१ या गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक २६ जुलै रोजी २०२४ रोजी अटक करण्यात आली, असून त्यास दिनांक २७ जुलै २०२४ रोजी मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाकडून त्यास दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. सदर गुन्हा मागील १५ महिन्यापुर्वी घडलेला होता. त्यामध्ये अज्ञात आरोपीने, अज्ञात इसमाचा, अज्ञात कारणाने खुन करुन त्याचे प्रेत १०० टक्के जाळुन ओळख संपविलेली असता, सोलापुर शहर आणि सोलापुर ग्रामीण कडील पथकांनी कौशल्यपूर्ण समांतर तपास करुन गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून आरोपीस अटक केलेली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड मंगळवेढा विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एस. खणदाळे, स.पो.नि.सचिन जगताप व तपास पथक तसेच सोलापुर शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा सोलापुर कडील स.पो.नि. संदीप पाटिल व तपास पथक यांनी केली आहे.