इम्रान खान यांना आणखी १४ तर पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल – कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवून त्यांच्याविरूद्ध १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तान माध्यमाने याची अधिकृत माहिती दिली आहे. रावळपिंडी येथील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात देण्यात आला.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय आणि सरकारमध्ये चर्चा सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. या चर्चेत पाकिस्तानच्या लष्कराचाही सहभाग आहे. कदाचित यामुळे इम्रान खानचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा त्यांच्या पक्षाच्या लोकांना वाटत आहे. मात्र अशातच कोर्टाने इम्रान खान यांना नवी शिक्षा सुनावली. नव्या प्रकरणात शिक्षा सुनावल्याने इम्रान खान आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.
इम्रान खान हे गेल्या ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर सहा जणांवर आरोप ठेवण्यात आले होते, ज्यांपैकी बहुतेक जण सध्या देशाबाहेर आहेत. मात्र, आता इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. १९० दशलक्ष डॉलर्सच्या भ्रष्टाचार प्रकरणात इम्रानची पत्नी बुशरा बीबी हिला अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान यांना १० लाख रूपायांचा दंड ठोठावला आहे. तसेच १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर ५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांना ७ वर्षांची शिक्षा जाहीर केली आहे. दंड न भरल्यास ६ महिन्यांची अधिक तुरंगवासाची शिक्षा दोघांना भोगावी लागेल.
लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नसीर जावेद राणा यांनी इम्रान खान यांच्याबाबत हा निर्णय दिला. इम्रान यांच्याविरोधातला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खटला आहे. यापूर्वी इम्रान खानला शिक्षेचा निर्णय तीन वेळा पुढे ढकलण्यात आले होते. १३ जानेवारी रोजीही या प्रकरणातील निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी अडियाला कारागृहातच बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या न्यायालयात हा निर्णय देण्यात आला. याप्रकरणी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने डिसेंबर २०२३ मध्ये इम्रान खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.