दिरानं केला दोन्ही भावजयींचा खून, अहिल्यानगरमध्ये किरकोळ कारणांवरून दुहेरी हत्याकांड

अहिल्यानगरचा अकोले तालुका दुहेरी हत्याकांडानं हादरलाय. अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दिरानेच त्याच्या दोन भावजयींची कोयत्यानं सपासप वार करुन हत्या केली. हत्येनंतर दीर घटनास्थळावरुन फरार झाला असून आरोपी दिराचं नाव दत्तात्रय प्रकाश फापाळे आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. तसंच, पोलिसांनी नजीकच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलं असून आरोपी माथेफिरु असल्याचं सांगितलं जातंय.
उज्वला अशोक फापाळे (वय ३५), आणि त्यांची जावबाई वैशाली संदीप फापाळे (वय ४०) असे या हत्याकांडातील मृत महिलांची नावे आहेत. पोलिसांना माहिती मिळताच अकोले पोलिस (Akole) घटनास्थळी पोहचले असून पंचानामा केला आहे, हाती आलेल्या माहिती नुसार मयत उज्वला यांच्या पतिचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, यानंतर उज्वला फापाळे ही कामानिमित्त चाकण या ठिकाणी राहत होती, शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्वला ही घरी आली त्याचेवळी तिचा दिर आरोपी दत्तात्रय फापाळे हा भावजयला म्हणाला’ तुझ्या पतीसाठी मी खर्च केला आहे, ते पैसे माझे देऊन टाक’ तसेच शेतीच्या वादातून त्यांच्यात वाद (Dispute) वाढला. आणि आरोपीने कोयत्याने भावजय वर सपासप वार करत तिचा खून केला आहे.
यावेळी मोठा आरडाओरडा झाल्याने भावकीतील वैशाली फापाळे ही महिला उज्वला हीला वाचवण्यासाठी मध्ये पडल्याने आरोपीने वैशालीवर देखिल कोयत्याने वार करून त्या दोघींचीही हत्या केली आहे. उज्वला हीला दोन लहान मुले आहेत, मुलांना तिने माहेरी ठेवले होते, त्यामुळं उज्वलाचे दोन लहान मुलं वाचली आहेत, मात्र भांडण सोडवायलामध्ये पडलेल्या वैशाली फापाळे यांना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. आरोपी दत्तात्रय फापाळे हा दुहेरी हत्याकांड करून पसार झाला असून हातात कोयता घेऊन जातानाचा त्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहे. पुढील तपास अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे करत आहेत.