क्राइममहाराष्ट्र

मद्याच्या धुंदीत एसटी बस चालवली; चालकाविरोधात गुन्हा दाखल

सांगोला :  जत – ठाणे ( सांगोला मार्गे ) जाणाऱ्या एस. टी. बस चालकाने मद्यप्राशन करून, एस. टी. बस चालवल्या प्रकरणी वाहकाने दिलेल्या फिर्यादी वरून सांगोला पोलीसात ठाणे आगराच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याप्रकरणी दिनांक १३ सप्टेंबर रोजी वाहक गजानन कोंडीबा राऊते  रा.खोपट, एस. टी. डेपो, ता. जि. ठाणे यांनी सांगोला पोलीसात बस चालक विठ्ठल महादेव नरवडे रा. मु. पो. कासापुरी, ता. पाथरी, जि.परभणी याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे एस. टी. वाहक म्हणून ठाणे डेपो येथे नोकरी करत आहेत. दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वाहक व सोबत बस चालक विठ्ठल नरवडे असे बस (एम.एच. २० बी. एल. १४३६) घेऊन जत ते ठाणे ( सांगोला मार्गे) प्रवासी घेऊन निघाले होते.  लोहगाव ता. जत येथे रोडवरून बस जात असताना एका मोटरसायकलीस ओव्हरटेक करत असताना बसच्या पाठीमागील बाजुस टेम्पोच्या पाठीमागील बाजु घासली.
टेम्पोचा चालक खाली उतरून आला व  बस चालक विठ्ठल नरवडे यास वाद घालू लागला, यावेळी फिर्यादी वाहक हे त्यांचा वाद सोडण्यासाठी गेले असता, सदर लोक फिर्यादी यांच्यासोबत वाद घालू लागले.  फिर्यादी यांनी लोकांना समजावून सांगितले व चालक विठ्ठल नरवडे यास बस सावकाश चालवा असे सांगत असताना फिर्यादी यांच्या लक्षात आले की, बस चालक विठ्ठल नरवडे हे कोणतीतरी नशा करून गाडी चालवत आहेत. त्यावेळी बसमधील सर्व प्रवासी आरडा -ओरडा करू लागले व फिर्यादीस, बस तुम्ही चालवा नाही तर आम्ही बसमधून खाली उतरतो असे म्हणाले. फिर्यादी यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सदर बस लोहगाव ते सांगोला बसस्थानकापर्यंत चालवत आणली. सांगोला बसस्थानकात बस आल्यावर एक प्रवासी महिलाने बसस्थानकातील तक्रार कक्ष येथे जावून चालकाच्या विरूध्द तक्रार केली.
बसस्थानक प्रमुख पंकज तोंडे हे तेथे आले, फिर्यादी वाहक व बस चालक विठ्ठल नरवडे यास घेऊन सांगोला पोलीस ठाणे येथे आणले. सदरचा चालक विठ्ठल नरवडे हा मद्यसेवन केलेल्या अवस्थेत असल्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे घेवून आले, तेव्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता, चालक मद्यसेवन करून अंमलाखाली असल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी अभिप्राय दिला आहे, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button