एकनाथ शिंदे यांचे समर्थकांना आवाहन, आता एकत्र येऊ नका
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्यात अजूनही मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव निश्चित झाले नाही. अशातच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मध्यरात्री ‘एक्स’ सोशल मीडियावरुन ट्वीट करत समर्थकांना आवाहन केलं आहे.
यात ते म्हणाले की, महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो, असं एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 25, 2024
पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
दोन फॉर्म्युलावर चर्चा
पहिला फॉर्म्युला म्हणजे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा. या फॉर्म्युलासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार, केवळ भाजप आणि शिवसेना यांना मुख्यमंत्रिपद वाटून दिलं जाणार आहे.
दुसरा फॉर्म्युला २-२-१ अशा आहे. त्याप्रमाणे भाजप-शिवसेना प्रत्येकी दोन-दोन वर्ष, तर अजित पवार एक वर्ष मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचं ठरलं आहे. साहजिकच या मागणीसाठी दादांचा गट आग्रही आहे. मात्र यापैकी कुठल्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार, की पाचही वर्ष एकालाच मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.