कुऱ्हाडीच्या धाकावर मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

धाराशिव : प्रतिनिधी – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधम सावत्र बापाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्त मजुरी व ५१ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. यापैकी ५० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी जानेवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
शासकीय अभियोक्ता ॲड. एम. देशमुख यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील एका गावात कुऱ्हाडीचा धाक दाखवून सावत्र वडिलांनीच मुलीवर अत्याचार करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी बापाला दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली, संबंधित मुलीची आई व सावत्र वडील यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पीडित मुलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई येथे तिच्या आजीकडे झाले. अकरावीला ती शिक्षणासाठी नळदुर्ग मध्ये आली. तिची आई, लहान भाऊ व सावत्र वडिलांसोबत ती राहू लागली.
१० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सावत्र वडील शेतात कामासाठी गेले होते तर आई बाजार आणण्यासाठी गेली होती. आणि भाऊ बाहेर गेला होता. आणि पिडीता घरामध्ये एकटीच असताना पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी हे हातात कुऱ्हाड घेऊन आले व त्यांनी पिडीतेला अंगावरील सर्व कपडे काढण्यासाठी सांगितले. त्यावेळी पिडीतेने कपडे कशाला काढायला सांगता असे विचारले असता तु गप्प कपडे काढ नाहीतर जिवे मारतो. अशी धमकी आरोपीने पिडीतेस दिली व आरोपीने पिडीतेचे अंगावरील कपडे काढले व पिडीतेसोबत तिचे इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध केले. सदर घटना कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या आईला ठार मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. पिडीतेने तिच्या आईला झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले असता आई तिला घेऊन पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे गेली आणि गुन्हा दाखल केला. त्यावरून सदर आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहीते यांचे समोर घेण्यात आली. सरकार पक्षाच्यावतीने एकुण ८ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या व बचाव पक्षाच्यावतीने १ साक्षीदार तपासण्यात आला. सरकारी पक्षाचा पुरावा व शासकीय अभियोक्ते देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पिडीतेचे सावत्र वडिल आरोपी याने पिडीतेवरती बलात्कार केल्याचे सिध्द झालेवरून आरोपीस न्यायालयाने १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व ५१ हजार रुपये दंड त्यापैकी ५० हजार रुपये पिडीत मुलीस व दंड न भरल्यास २ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा अशी शिक्षा ठोठावली आहे.