भारतराजकारण

मी 15 वेळा मतदान केलं; मध्यप्रदेशात बोगस मतदान केल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली

मध्य प्रदेशमधील 29 लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. मात्र या निवडणुकीमध्ये साम, दाम, दंड आणि भेद या नितीचा वापर सत्ताधाऱ्यांकडून झाल्याचे समोर आले आहे. निवडणुकीनंतर भाजपच्या एकच नेता अनेकदा मतदान करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तर भाजपचे पदाधिकारी आम्ही 15-15 वेळा मतदान करत असल्याचे अभिमानाने सांगत आहेत. विशेष म्हणजे खासदारासमोर पदाधिकारी या फुशारक्या मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेसनं निवडणूक आयोग आणि न्यायालायात धाव घेण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपच्या खासदार लता वानखेडे गुरुवारी संध्याकाळी सागर लोकसभा मतदारसंघातील सिरोंज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या लटेरी तहसीलच्या दौऱ्यावर होत्या. लटेरीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंरोज विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार उमाकांत शर्मा यांचे प्रतिनिधी आणि लटेरी नगर परिषदेच्या अध्यक्षांचे पती संजय अत्तु भंडारी यावेळी वानखेडेंच्या स्वागताला हजर होते.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी केलेल्या हेराफेरीची यादीच भंडारी यांनी वानखेडेंसमोर वाचून दाखवली. ‘आम्ही १३ मतदान केंद्रांवर काँग्रेसच्या पोलिंग एजंटला बसूच दिलं नाही,’ असं भंडारींनी वानखेडेंना सांगितलं. त्यावेळी तिथे भाजप नगरसेविकेचे पती महेश साहूदेखील उपस्थित होते. मी १५ बोगस मतं दिली, असं साहू म्हणाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.

मतदान निष्पक्षपातीपणे होण्याची गरज असताना सागर लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी बरीच हेराफेरी झाल्याचं म्हणत काँग्रेसनं भाजपवर शरसंधान साधलं आहे. ‘भाजप नेते स्वत:च बोगस मतदान केल्याचं सांगत आहेत. आम्ही हे प्रकरण निवडणूक निकाल आणि न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. याशिवाय पोलिसांत तक्रारदेखील दाखल करु,’ असा आक्रमक पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे.

सागर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या लता वानखेडे तब्बल साडे चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना ७ लाख ८७ हजार ९७९ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या चंद्रा बुंदेला यांना ३ लाख १६ हजार ७१७ मतं मिळाली. राज्यात लोकसभेच्या एकूण २९ जागा आहेत. या सर्व जागांवर भाजपला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button