पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश यादवने घेतली ५० हजाराची लाच
अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्तासाठी घेतले पैसे ; पोलीस अंमलदारासह पीआय विरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त देण्याच्या बदल्यात दीड लाखाची मागणी करून ५० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचा निरीक्षक राजेश यादव आणि त्याच्या वाहन चालकाविरुद्ध त्याच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली. तक्रारदाराने लाच मागणीचे मोबाईलमध्ये चित्रण केल्याने हा प्रकार उघडकीस आला. पुंडिलकनगर पोलीस ठाणे प्रभारी राजेश सुदाम राठोड (३८, रा. अग्रसेन शाळेसमोर, विटेखडा) आणि त्याचा वाहन चालक सुरेश बाबूसिंग पवार (रा. जयभवानी नगर) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
३८ वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीचा गारखेडा गट क्रमांक ५०/२/४ मधील जमीन क्षेत्रफळ २४००० स्क्वेअर फुट रेणुकानगर येथील जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्त मिळवण्या करिता पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मार्च महिन्यात रीतसर अर्ज केला होता. त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचा प्रभारी राजेश यादव याचा वाहन चालक सुरेश पवार याने तक्रारदार यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५० हजार रुपये ठरले व पोलीस बंदोबस्त देऊन अतिक्रमण काढल्यानंतर जागेचा ताबा मिळविल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये पोलीस निरीक्षक राजेश यादव यांना देण्याचे ठरले. ३ एप्रिल रोजी पोलीस अंमलदार वाहन चालक सुरेश पवार याने पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या जवळच ५० हजार रुपये स्विकारले. परंतु तक्रारदार यांच्या जागेवरील अतिक्रमण न काढल्यामुळे, तक्रारदार यांनी पवारची भेट घेऊन त्यांना दिलेल्या पैशाची विचारणा केली. तेव्हा पवार याने तक्रारदार यांना थेट पोलीस निरीक्षक राजेश यादव याच्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्या समोर उभे केले. तक्रारदार यांनी यादवला दिलेल्या ५० हजार रुपये विषयी विचारणा केली. तेव्हा त्याने सांगितले की तुमचे काम न झाल्यामुळे आम्ही तुमचे पैसे दोन टप्प्यात परत देतो असे पोलीस निरीक्षक राजेश यादव म्हणाला. हे सर्व तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले. त्यानंतर देखील पैसे परत मिळत नसल्याने तक्रारदार यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. सर्व पुरावे सादर केले. त्यानंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर, पोहे प्रकाश घुगरे, अशोक नागरगोजे, सी. एन. बागुल यांनी पडताळणी करून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेश यादव आणि पोलीस अंमलदार सुरेश पवार याच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला.