कपिल पिंगळे हत्या प्रकरण : शिवराम ठोंबरे हाच मास्टरमाइंड, अद्याप फरार
अटकेतील पाच आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

छत्रपती संभाजीनगर : हॉटेल चालक तरुणावर चाकूने १७ वार केल्यानंतर गावठी पिस्टलने गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याप्रकरणात अटक पाचही आरोपींना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.आर.उबाळे यांनी सोमवारी (दि.२९) दिले. विशेष म्हणजे अटक आरोपींची मदत घेवून कपिलची हत्या करणारा मुख्य आरोपी शिवराम हरिभाऊ ठोंबरे (रा. देवगिरी कॉलनी, रांजनगाव शे.पुंं. ता. गंगापुर) आणि खून केल्यानंतर आरोपींना शेंद्रा एमआयडीसी परिसरातून थार कारने माजलगाव मार्गे नांदेडला घेवून जाणारा आरोपी शिव नंदवंशी असे दोघे अद्यापही पसार असून पोलीस त्यांचा कसुन शोध घेत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये जयेश उर्फ यश संजय फतेलष्कर (24, रा. गोगाणाथ नगर, बेगमपुरा), विकास सुरेश जाधव (18, रा. साखर कारखाना, रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (23, रा. शनिमंदीर जवळ, कलिकुर्ती जालना), भरत किसन पंडूरे (33, रा. डिंबर गल्ली, बेगमपुरा) आणि अमर उर्फ अतुल गणेश पवार (40, रा. हमालपुरा, जालना) यांचा समावेश आहे. प्रकरणात मयत कपिल यांचे वडील सुदाम पिंगळे (50) यांनी फिर्यादी दिली. त्यानूसार, वरील आरोपींनी मृत कपिल पिंगळे हा अनुसुचित जातीचा असल्याचे माहिती असतांना देखील कट रचून खून केल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जामाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह, कलम 103 (1), 140 (1), 3 (5) आणि शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान पोलिसांनी 20 जुलै रोजी जयेश उर्फ यश फतेलष्कर, विकास जाधव, सागर उर्फ जितसिंग मुळे आणि भरत पंडूरे या चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर 22 जुलै रोजी आरोपी फतेलष्कर याला मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणि काडतूस आणुन देणारा आरोपी अमर उर्फ अतुल पवार याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
थार जीपने गाठले नांदेड
कोठडी दरम्यान आरोपींनी कबुली दिली की, खून केल्यानंतर आरोपींना शिव नंदवंशी याने मदत केली. आरोपी शेंद्रा एमआयडीसी येथील जय महाराष्ट्र हॉटेलात आल्यानंतर शिव नंदवशीं याने थार या जीपने त्यांना माजलगाव मार्गे नांदेड येथे नेले. तत्पूर्वी त्याने आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे बदलून त्यांना दुसरे कपडे दिले. तर मुख्य आरोपी शिवराम ठोंबरे याने वरील आरोपींच्या मदतीने कपिलचा खून केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली.
आरोपींना 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान अटक पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी गुन्ह्यातील पसार आरोपींना अटक करायची आहे. खुनाचा नेमका उद्देश काय होता याचा देखील तपास बाकी आहे. गुन्ह्यात वापरलेली थार गाडी, आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे हस्तगत करायची आहे. हॉटेल जय महाराष्ट्र लाडगांव ते नांदेड पर्यंतचे सीसीटीव्ही हस्तगत करायचे आहेत. आरोपी अमर उर्फ अतुल पवार याने मध्यप्रदेशातून कोणाकडून गावठी पिस्टल आणले याचा देखील तपास बाकी असून गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.
काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयात ‘थार’ जीप
कपिल पिंगळे याच्या कुटुंबीयांनी गुन्हे शाखेतील एका कर्मचाऱ्याचे नाव घेत तो शिवराम ठोंबरे सोबत अवैध धंद्यात पार्टनर असल्याचा आरोप केला होता. दरम्यान घटनेच्या काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या जुन्या गेटच्या आत गेल्यानंतर मागच्या बाजूने एक थार जीप एक व्यक्ती धुताना दिसून आली होती. विशेष म्हणजे पोलीस दलात अद्याप कोणाकडे थार ही महागडी जीप असल्याचे ऐकिवात नाही. मात्र, तरीही थेट पोलीस आयुक्तालयाच्या आवारात जीप धुताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता हत्येच्या प्रकरणात थार जीपचा उल्लेख आल्याने पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.