जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांना लागणार दुप्पट दंड

छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते, चौका-चौकामध्ये मोठ्या संख्येने मोकाट जनावरे फिरताना दिसतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच, वारंवार अपघातही होतात. त्यामुळे मोकाट जनावरांना पकडून महापालिका कोंडवाड्यात टाकते. त्यासाठी म्हैस, रेडा, उंट, वगारीला पूर्वी ५०० रुपये दंड घेतला जात होता, आता तो थेट २ हजार रुपये करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हा दंड फक्त एका दिवसासाठी आहे. त्यापुढे प्रत्येक दिवसाला एक हजार रुपये दंड वाढत जाणार आहे.
शहर गोठामुक्त करण्याची घोषणा महापालिकेने अनेकवेळा केली, पण अद्याप शहरातून जनावरांचे गोठे हद्दपार झालेले नाहीत. शहराच्या अनेक भागात पशुपालकांनी गोठे तयार करून त्यात जनावरे ठेवली आहेत. काही ठिकाणी जनावरे बंदीस्त आहेत तर काही भागात पशुपालक जनावरे रस्त्यावर सोडून देतात. ही जनावरे दिवसभर भटकून रात्री परत जातात. भटक्या जनावरांमुळे वाहतुकीच्या कोंडीसोबतच अपघातही होतात. त्यामुळे महापालिकेतर्फे मोकाट जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकले जाते. त्यासाठी सिद्धार्थ उद्यान परिसरात कोंडवाडा आहे. वाहनांव्दारे जनावरे याठिकाणी आणली जातात. पशूपालकांकडून दंड घेतल्यानंतर जनावरे सोडली जातात. आता या दंडाची रक्कम तब्बल चारपटीने वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. म्हैस, रेडा, उंट, वगार या जनावरांसाठी पूर्वी ५०० रुपये पहिल्या दिवसी दंड घेतला जात होता. आता हा दंड थेट २ हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक दिवसी एक हजाराचा दंड लागणार आहे. त्यामुळे पशू पालकांना आता येथून पुढे अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे दिसून आले.
दरदिवशी लागेल दंड
गाय, बैल यासाठी ४०० रुपये घेतले जात होते. नव्या नियमानुसार एक हजार रुपये घेतले जाणार आहेत, नंतर प्रत्येक दिवसी ५०० रुपये दंड घेतला जाईल. गोऱ्हा, कालवड, घोडा, वासरू, गाढव आदी जनावरांसाठी पूर्वी ३०० रुपये तर आता ८०० रुपये, बकरी, बोकड, पिल्लू यासाठी पूर्वी २०० रुपये तर आता ४०० रुपये दंड घेतला जाणार आहे. एक सप्टेंबरपासून या दंडाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी शेख शाहेद यांनी सांगितले.