
कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करुन तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या हत्यावरून पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी कोलकाता पोलिसांना धारेवर धरलं आहे. पोलिसांवर पुरावे नष्ट करण्याचा कट रचला, पीडितेच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलिसांना आपल्या कामामुळे लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. असे ट्विट करत त्यांनी कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना सुनावलं. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून कोलकाता पोलीस हे प्रकरण लपवण्याचा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याविषयी अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पाेलीसांनी पहिल्यांदा अनैसर्गिक मृत्यूची नोंद का केली. पाशवी बलात्कार आणि खून प्रकरणाला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस आयुक्त न्यायालयात ही आत्महत्या असल्याचं जाहीर करु शकतील का. पाेलिसांच्या तपासावर विश्वासार्हता नाही, असंही ते म्हणाले.
या प्रकरणाची निष्पक्ष, प्रामाणिक आणि पूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस कुठल्या टोळीला वाचवण्यासाठी या प्रकरणाला सामूहिक अत्याचार मानण्यास नकार देत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोलिस आणि सरकारकडून कोणतेही प्रयत्न होत नसून त्यांना माध्यमांशी बोलण्यापासून रोखले जात आहे असे ते म्हणाले.
सध्या हे प्रकरण सीबीआयकडे सुपुर्द करण्यात आले आहे. याची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे तपास पथक दिल्लीहून कोलकाता येथे पोहोचले असून आरोपी संजय रॉयला सीबीआयने कोलकाता पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या पथकाने त्याला गुन्हा घडला त्या ठिकाणी नेले. तसेच, अधिकाऱ्यांनी कोलकाता पोलीस आणि एसआयटीच्या सदस्यांची बैठक घेऊन या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे, याचीही माहिती घेतली. सीबीआयसोबत वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञही असल्याची माहिती आहे.