भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात?
मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड ही सर्वांच्या चर्चेचा विषय बनत चालला आहे. त्यातच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु, ही निवड आगामी नवीन वर्षात होणार कि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या नंतर होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे आत्ताचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे स्पष्ट झालं आहे.
पुढच्या वर्षी रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान रवींद्र चव्हाण यांना आता प्रदेशाध्यक्ष केलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी त्यांना पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल, अशी चर्चा आहे.