देश-विदेश

मराठी आणि मुस्लिमांना एका पैशाचा बिझनेस देणार नाही म्हणणाऱ्या टीसी निलंबित

मुंबई: मी मुंबईत असताना मराठी आणि मुस्लीम माणसाला एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे वक्तव्य करणारा पश्चिम रेल्वेचा मुजोर तिकीट तपासनीस आशिष पांडे याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आशिष पांडे याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये आशिष पांडे याने मराठी आणि मुस्लीम समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत सांगितले की, या घटनेची रेल्वेने गंभीर दखल घेतली आहे. आशिष पांडे याच्या व्हायरल ऑडिओ क्लीपची पुष्टी करण्यात आली असून त्या कर्मचारीला चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले आहे, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

आशिष पांडे याने नेमकं काय म्हटलं?
आशिष पांडे याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लीप प्रचंड व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये आशिष पांडे समोरच्या मराठी व्यक्तीला सुनावताना दिसत आहे. यामध्ये आशिष पांडे याने म्हटले होते की, मी विक्रोळीला टागोर नगरला राहतो. मी मुस्लीम आणि मराठी लोकांना बिझनेसच देत नाही. मला कोणी मराठी किंवा मुस्लीम रिक्षावाला भेटला तर मी त्यांच्या रिक्षातही बसत नाही. मी फक्त युपीवाला रिक्षावाला असेल तरच रिक्षात बसतो, अशी मुजोरीची भाषा आशिष पांडे याने वापरली होती.

एवढेच नव्हे तर आशिष पांडेला ज्या मराठी व्यक्तीने व्यवसायासंदर्भात फोन केला होता, त्यालाही पांडेने मी तुला बिझनेस देणार नाही, असे सांगितले. त्याने म्हटले की, मी परवाच ट्रू कॉलरमध्ये तुमचा नंबर बघितला. तुम्ही मराठी आहात हे बघितल्यानंतर मी तुमचा नंबर डिलिट केला, हे तुम्हाला माहिती असेल. कारण मला मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन माणसाला बिझनेस द्यायचा नाही. मी ९ वाजता कामाला जातो आणि १० वाजेपर्यंत ५००० रुपये कमावलेले असतात. मला पैशांचा गर्व नाही, पण मी तुम्हाला हे सांगतोय. मी मुंबईत असेपर्यंत मराठी आणि मुस्लीम लोकांना एका रुपयाचा बिझनेस देणार नाही, असे सांगून आशिष पांडे याने फोन ठेवून दिला होता. मात्र, त्याची ही क्लीप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. त्यानंतर आशिष पांडे हा कोण आहे, याचा शोध घेतला गेला. यानंतर रेल्वेकडून आशिष पांडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आता त्याची चौकशी केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button