
भुवनेश्वर : आेडीशा राज्यातील कटक शहरात एससीबी वैद्यकीय रुग्णालयात बलात्काराची घटना घडली. ११ ऑगस्टला रुग्णालयाच्या कार्डियोलॉजी विभागात दोन रुग्ण इकोकार्डियोग्राम चाचणीसाठी गेल्या होत्या. तेव्हा तिथे काम करणाऱ्या डॉक्टरनं त्यांच्यावर बलात्कार केला. दोन्ही रुग्णांनी डॉक्टरविरोधात कटकच्या मंगलबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
सध्या देशात कोलकात्याच्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रकरण चांगले गाजत आहे. तेथे डॉक्टर तरुणीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनंतर मृत तरुणीला न्याय मिळावा यासाठी डॉक्टरांची निदर्शनं सुरु आहेत. त्यातच डॉक्टरी पेशाला काळीमा लावणारी ही घटना घडली आहे.
ओदिशातील एका वैद्यकीय रुग्णालयात रहिवासी डॉक्टरनं रुग्णालयाच्या परिसरात दोन रुग्णांवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटना समोर आल्यानंतर पीडित रुग्णांच्या कुटुंबियांनी डॉक्टरला चोप दिला. त्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.