महाविद्यालय आवारातचं ‘प्राध्यापकास’ लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारहाण
कार नीट चालवा म्हणून रागावल्याचे कारण

सांगोला : घराकडून महाविद्यालयाकडे चाललेल्या प्राध्यापकाच्या दुचाकीस भरधाव कारने कट मारल्यानंतर, सदर चालकाला कार नीट चालव म्हणून रागावल्या कारणावरून चिडून सहा जणांनी मिळून प्राध्यापकास कॉलेज परिसरात लाथाबुक्क्यांनी, बेल्टने मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी मारूती आनंदा हाके (वय ५६) रा. जिव्हाळा कॉलनी, शिवाजीनगर, सांगोला यांनी पोलीसात आवेज सर्फराज तांबोळी, अस्लम तांबोळी, शाहरूख शफीक तांबोळी, असिफ बांडु पठाण, रिहान फिरोज मुलाणी सर्व रा. सांगोला ता. सांगोला अश्या पाचजणांसह एका अनोखळी व्यक्तिविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय , सांगोला येथे सह. प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाण्यासाठी घरातून वासूद रोडने मोटरसायकलवर निघाले होते. त्यावेळी फिर्यादी हे ‘कुटूंब बझार’ समोर आले असता, एक कार पाठीमाघून वेगात येऊन फिर्यादी यांच्या दुचाकीस कट मारून तसेच पुढे निघुन गेली.
फिर्यादी हे कॉलेजच्या गेटजवळ आले, तेव्हा त्यांना सदर कट मारून गेलेली कार गेटजवळ थांबलेली दिसली. फिर्यादी यांनी कार जवळ जाऊन कारमध्ये पाहिले असता, कारमध्ये तीन मुले होती, त्यांना फिर्यादी यांनी कार चालवा असे म्हणत समज देऊन गाडी नीट चालवा,
शाळा आहे असे सांगत रागवत असताना, इतर लोकांनी जाऊ द्या, सर येवढ्या वेळ असे म्हणाल्याने फिर्यादी हे कॉलेजमध्ये गेले.
पावणेदहा वाजण्याच्या सुमारास आवेज तांबोळी व इतर तीन मुले फिर्यादी यांच्या ऑफीससमोर येऊन फिर्यादी यांना
तुम्ही बाहेर चला, असे म्हणत असताना त्यांना कॉलेजमधील इतर कर्मचारी व शिक्षकांनी बाहेर पाठवून दिले.
सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना महाविद्यालयाचे प्राचार्य सिकंदर मुलाणी यांनी कार्यालयात बोलावुन घेतले. त्यांनी व इतर स्टाफ यांनी सांगितले की, सदरचे मुले तुम्हाला मारहाण करण्यासाठी सकाळपासून तीनवेळा कॉलेजमध्ये आले होते. आम्ही त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन समजावून सांगितले आहे.
त्यानंतर फिर्यादी हे सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्राचार्य कार्यालयातून बाहेर येऊन मैदानात आले असता, अचानक आवेज तांबोळी व सोबत इतर पाच ते सहा मुले समोर आले. ‘तु आम्हाला सकाळी का रागवला’ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यानी मारहाण करू लागले. त्यांच्या मारहाणीमध्ये फिर्यादी हे खाली बसले, त्यावेळी त्याच्यापैकी एकाने फिर्यादी शिक्षकास पाठीमाघून लाथ मारल्याने फिर्यादी समोर तोंडावर पडले. सर्वांनी फिर्यादी यांना लाथांनी तोंडावर, पाठीवर, पोटावर छातीवर मारहाण केली व त्यापैकी एकाने कंबरेच्या बेल्टने फिर्यादी यांना मारहाण केली.
फिर्यादी शिक्षकाच्या नाकावर ठोसा बसून नाकातून रक्त येऊ लागले, त्यावेळी कॉलेज मधील माने सर, शिपाई निसार मुलाणी, कोळवले सर व इतर स्टाफ ने फिर्यादी यांना, त्यांच्या तावडीतून सोडवून प्राचार्य यांच्या कार्यालयाकडे घेऊन जात असताना, तुम्हा सर्वांना बघून घेतो, गेटच्या बाहेर या, तुम्हाला ठेवत नाही, अशी धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत निघून गेले, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादी म्हंटले आहे.