महिलेची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे
मध्यप्रदेशातील गुना येथील खळबळजनक घटना

गुना : देशात महिलाविरुध्द घटनेचा आलेख वाढताच असून अशात एक अत्यंत हादरवणाऱ्या आणि संतापजनक घटना मध्यप्रदेशातील गुना येथे घडली आहे. तेथे एका महिलेच्या मृतदेहाचे तीन तुकडे करुन ते पोत्यात भरुन फेकल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
गुना जिल्ह्यातील चाचोडा बिनागंज भागातील खातोली गावात एका रेशन दुकानाच्या आवारात ३ दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह तीन तुकड्यांमध्ये सापडला होता, ज्यामुळे सारेच हादरले होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
झुनाबाई तन्वर (वय वर्ष ४०) असं या महिलेचं नाव असून पतीच नाव शेरू सिंह असल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला सांडिल्यखेडी गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. महिलेची हत्या करून तिचे तीन तुकडे करण्यात आले होते. यानंतर तिचा मृतदेह गोणीत भरुन फेकून देण्यात आला.
झुनाबाई यांचा मुलगा गोविंद सिंग याने सांगितले की, त्याची आई बिनागंज येथे राखी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथील एका संशयितालाही ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.