महाराष्ट्रराजकारण

गावात पडली कमी मते म्हणून बॅलेट पेपरवर मतदान, ईव्हीएमची करणार पोलखोल?

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यातच माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ज्या उमेदवाराला ईव्हीएमवर मतदान केलं, त्याच उमेदवाराला बॅलेट पेपरवर मतदान करा, असे आवाहन करत 3 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा मतदान घेण्याचं काम हाती घेतलं आहे. या गावात रासपच्या उत्तम जानकर यांना या विधानसभेत कमी मते मिळाली आहे. मात्र यापूर्वी झालेल्या निवडणूकीत उत्तम जानकर यांना मोठे मताधिक्य मिळत आले होते. त्यामुळे क्रॉस चेक करण्यासाठी जानकर गटाने स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या गावाने माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देत शासकीय कर्मचारी देण्याबाबत पत्र दिले आहे.

ग्रामस्थांनी एकत्र येत हा निर्णय घेत प्रशासनाला तशा पद्धतीचे निवेदन देखील दिले आहे. मात्र, आता हे मतदान व ही मतमोजणी माध्यमांच्या देखरेखित होणार असून याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी देखील पूर्ण होणार आहे. गावातील उत्तम जानकर यांच्या गटाने हे मतदान व मतमोजणी घेण्याची भूमिका घेतली. या मतमोजणीतून ग्रामस्थांच्या शंका दूर होतील असा विश्वास वाटत असल्याचं विजयी उमेदवार उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय ज्यांनी मतदान केलं त्यांची मते नेमकी कुठे जातात हेही समोर येणार असून यातून ईव्हीएम मशीनची पोलखोल होऊ शकेल. माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात या पद्धतीची भावना तयार झाली असून मोहिते पाटील व जानकर गट एकत्र आल्याने किमान दीड लाखाच्या फरकाने आपण विजयी होणार असा विश्वास प्रत्येकाला होता. मात्र, मतमोजणी झाल्यावर केवळ तेरा हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवल्याने संपूर्ण तालुक्यात आक्रोश असल्याचे जानकर यांनी म्हटलं आहे. जे गाव माजी आमदाराला माहीत नव्हते, जो कधी तिकडे गेला नाही अशा गावातही जर त्याला मताधिक्य मिळत असेल तर लोकांची शंका निश्चित निरसन होणे गरजेचे असल्याचे जानकर यांनी म्हटलं. तसेच, या मतदान व मतमोजणीतून कायदेशीर दृष्ट्या काही साध्य होणार नसले तरी बॅलेट पेपरवर मतदान करून काय होते, हे तीन तारखेला समोर येणार आहे.

गावात झळकला बोर्ड
मारकडवाडी गावात मतदान जागृती करण्यासाठी डिजिटल बॅनर झळकले आहेत. ”मौजे मारकडवाडी (ता.माळशिरस) गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान पडताळणी प्रक्रिया पार पाडावयाची आहे. आपण दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, याची नोंद घ्यावी.”, अशा आशयाचा संदेश या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

मारकडवाडी गावात यंदाच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button