बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये पेइंग गेस्ट (पीजी) मध्ये राहणाऱ्या महिलेच्या हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये महिला मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून या प्रकरणात महिलेच्या माजी रूममेटची भूमिका तपासली जात आहे.
बिहारमधील एका २४ वर्षीय महिलेची बेंगळुरू येथील पीजीमध्ये निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर, पोलिसांना या घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात यश आले. सीसीटीव्हीनुसार, एक व्यक्ती पॉलिथिन बॅग घेऊन ‘पेइंग गेस्ट’ रूममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तो दरवाजा ठोठावतो आणि काही वेळाने त्या महिलेला ओढून बाहेर काढताना दिसतो.
पीडिता हल्ल्याचा प्रतिकार करते, पण मारेकरी तिला पकडतो, तिचा गळा कापतो आणि पळून जातो. आवाज ऐकून इमारतीत उपस्थित असलेल्या इतर महिला घटनास्थळी पोहोचल्या मात्र त्या बघतच राहिल्या. खुनाची ही घटना रात्री 11.10 ते 11.30 च्या दरम्यान घडली. फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळावरून पळतानाही दिसत आहेत.
व्हीडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे प्रकरण?
बिहारमधील कृती कुमारी या २४ वर्षीय महिलेची २३ जुलै रात्री उशिरा बेंगळुरू येथील पीजी निवासस्थानी निर्घृण हत्या करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कृती कुमारी ही बिहारची असून ती शहरातील एका खासगी कंपनीत काम करत होती. आरोपी मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. अभिषेक असे आरोपीचे नाव आहे. तो कृती कुमारीच्या रूममेटचा प्रियकर होता. अभिषेक आणि त्याच्या मैत्रिणीचे संबंध चांगले नव्हते.
त्यामुळे अभिषेकची प्रेयसी कृती कुमारीच्या सांगण्यावरून पीजीमध्ये राहायला गेली असे सांगितले जात आहे. त्यामुळे अभिषेकने कृती कुमारीला लक्ष्य केले असावे, असा संशय पोलिसांना आहे. कृती कुमारी देखील अलीकडेच कोरमंगला येथील व्हीआर लेआउट पीजीमध्ये राहायला आली होती. कोरमंगळा पोलिसांनी घटनास्थळ गाठून कसून तपास सुरू केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त रमण गुप्ता यांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, गुन्हेगार पीडितेचा ओळखीचा होता. सध्या फरार असलेल्या आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.