नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आज या वादानं पुढचं टोक गाठलं. संसदेत हा मुद्दा गाजत असताना संसदेबाहेर आज धक्काबुक्की झाली. त्यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला आहे. यात दोघे खासदार जखमी झाले.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी संसदेत निदर्शने केली. या निदर्शनावेळी भाजप खासदाप प्रतापचंद्र सारंगी हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत खासदार प्रतापचंद्र सारंगी यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी धक्का दिल्यामुळेच जखमी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Delhi | BJP MP Mukesh Rajput also got injured. His condition is serious and he has been admitted to the ICU of RML hospital https://t.co/q1RSr2BWqu
— ANI (@ANI) December 19, 2024
भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी म्हणाले, “राहुल गांधींनी धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिला. त्यानंतर ते माझ्या अंगावर कोसळले त्यामुळे हा अपघात झाला असल्याचे प्रताप सारंगी यांनी म्हटले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. फरुखाबादचे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. ते मला धमक्या देत होते, त्यामुळे हे घडले. हा संसदेचा विषय आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते संविधानावर हल्ला करत आहेत, असं ते म्हणालेत.
माणिकम टागोर यांनी केलं मोठं विधान
या घटनेबाबत काँग्रेसचे खासदार बी. माणिकम टागोर म्हणाले की, “भाजपचे लोक नाटक करत आहेत. या घटनेबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहोत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या संकुलातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर निषेध मोर्चा काढला.
‘भाजपने आंबेडकरांचा अपमान केला’
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले, “ते (भाजप) त्यांच्या स्वसंरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. कालच त्यांनी अमित शहांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची खूप हानी केली. काल भाजपच्या सोशल मीडियाने काय केले? त्यांनी आंबेडकरांची जागा घेतली. सोरोस यांचे छायाचित्र पोस्ट केले. आणि ते पुन्हा आंबेडकरांचा अपमान करत आहेत, हे लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही.” असे त्यांनी म्हटले.