क्राइम स्टोरी

Crime Story : कर्जाने ग्रासला विशाल, आजीचा खून करतो खुशाल; दिशाहीन तरुणांच्या मनात पेटते कुविचारांची मशाल!

जळगाव : अडचणीत अथवा संकटात सापडल्यानंतर अनेक लोकांच्या मनात कुविचार येत असतो. मनात आलेला कुविचार अथवा त्या कुविचारातून केलेली चूकीची कृती वेळीच दुरुस्त करणे आवश्यक असते. काही लोक ती चूक पुन्हा करतात. एक चुक अथवा गुन्हा लपवण्यासाठी मनुष्य दुसरा गुन्हा करतो आणि त्यातून समस्या अधिक किचकट होते. मनुष्याच्या हातून घडलेला एखादा गुन्हा त्याला जीवनभर त्रासदायक ठरतो आणि गुन्हेगारीचा शिक्का त्या व्यक्तीच्या माथ्यावर बसतो. त्यामुळे मनात आलेल्या कुविचारापासून आपण कसे परावृत्त व्हायचे हे ज्याचे त्याने वेळीच ठरवायचे असते. ज्यावेळी मनुष्य एखाद्या संकटात सापडतो त्यावेळी मनुष्याची मानसिक अवस्था दोलायमान झालेली असते. अशा नाजुक आणि दोलायमान प्रसंगात मनुष्याने भानावर राहून, संयम बाळगून, सदसदविवेक बुद्धीचा वापर करुन शांत मनाने आणी डोक्याने विचार केल्यास त्याचा गहन प्रश्न निश्चित सुटू शकतो अथवा त्या समस्येची तिव्रता कमी देखील होऊ शकते. अशा कठीण प्रसंगात मनुष्याने त्याची समस्या जवळच्या योग्य व्यक्तीजवळ कथन केली तर त्यावर एखादा चांगला उपाय देखील सापडतो. थोडक्यात बोलायचे म्हणजे कठीण प्रसंगात मनुष्याने गांगरुन न जाता संयम ठेवणे अतिशय गरजेचे असते.

डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने चक्क आपल्या आजीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर आजीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आणि हाताच्या दंडावरील चांदीचे कडे काढून घेतले. आजीचा मृतदेह पोत्यात भरुन त्याने थेट परगावी एका सराफी दुकानदाराकडे जावून त्या ऐवजाची विक्री केली. संयम हरवलेल्या या तरुणाच्या मनात आलेल्या कुविचारातून हा अप्रिय प्रकार घडला आणि त्याला गजाआड होण्याची वेळ आली. या घटनेचा क्रम जाणून घेऊया.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हे एक तालुक्याचे ठिकाण आहे. या तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर हे एक लहानसे गाव आहे. शांत वातावरण असलेल्या या गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात आणिएकमेकांच्या मदतीला देखील धावून जातात. या गावात विशाल प्रभाकर भोई हा तरुण रहात होता. मजूरी करणा-या विशाल यास छानछोकीत राहण्याचा नाद होता. चांगले चांगले कपडे वापरणे, पत्ते खेळणे आणी मोटार सायकलवर फिरणे हा त्याचा षोक होता. त्यामुळे त्याने कर्ज काढून मोटार सायकल घेतली होती. त्यातून त्याच्या डोक्यावर सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे कर्ज झाले होते. कालांतराने त्याला हे कर्ज डोईजड झाले. आता हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने तो ग्रासला होता. कर्जाच्या चिंतेने त्याची दिवसाची चैन आणि रात्रीची झोप हिरावली. जळी स्थळी काष्ठी पाताळी त्याच्या डोक्यावरील कर्जाचे भुत त्याला सतावत होते. त्यामुळे तो बेचैन झाला होता. त्यामुळे तो संयम हरवून बसला होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विशालच्या मनात वेळोवेळी कुविचार येत होते.

तो रहात असलेल्या गावातच त्याच्या आजीची एक बहिण रहात होती. मंजाबाई दगडू भोई असे त्या आजीचे नाव होते. आजीची बहिण असलेली मंजाबाई नात्याने त्याची आजीच होती. मंजाबाईचे वय 80 वर्ष होते. आजी मंजाबाईला मुलबाळ नव्हते. त्यामुळे ती घरात एकटीच रहात होती. आजी मंजाबाईच्या कानात सोन्याच्या बाळ्या आणि हाताच्या दंडावर चांदीचे कडे रहात होते. जुन्या काळातील महिला हाताच्या दंडावर चांदीचे वजनदार कडे आजही घालतांना दिसतात. अडीअडचणीत तातडीने पैशांची गरज भासल्यास कुणाकडे हात न पसरता पैसे मिळवण्यासाठी हे चांदीचे कडे कामात येतील असा चांगला विचार करुन हे कडे वापरले जात होते. आजही अनेक वृद्ध महिलांच्या दंडावर सहजासहजी न निघणारे चांदीचे वजनदार कडे दिसून येतात. मात्र हेच चांदीचे कडे आणि अंगावरील दागीने अनेक वृद्ध महिलांच्या जीवाला घातक ठरल्याची देखील उदाहरणे आहेत.

आजी मंजाबाईच्या कानात सोन्याचे दागिने आणि दंडावर वजनदार चांदीचे कडे बघून नातू विशालच्या मनात वारंवार कुविचार येण्यास सुरुवात झाली. आजीला तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि दंडावरील वजनदार चांदीचे कडे मागितले तर ती सहजासहजी नव्हे तर देणारच नाही हे विशाल यास ठाऊक होते. मात्र कोणत्याही मार्गाने मार्गाने आजीच्या अंगावरील सोन्या चांदीचा ऐवज आपण मिळवला तर त्यातून आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी होऊ शकतो असा कुविचार विशालच्या मनात घर करुन बसला होता. त्यामुळे रात्रंदिवस त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. त्याचा संयम हरवला होता. त्याला कायम नजरेसमोर आजी आणि तिच्या कानातील दागिने व दंडावरील वजनदार चांदीचे कडे फिरत होते.

15 मे 2024 रोजी सायंकाळ होण्यापुर्वीत्याने डाव साधला. या दिवशी नेहमीप्रमाणे तो आजी रहात असलेल्या घरात ती एकटी असल्याची संधी साधली. तो तिच्याजवळ गेला. त्याने कुणाला काही कळण्याच्या आत आजीचा उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली. 80 वर्षाची आजी मंजाबाई त्याला प्रतिकार करण्यास असमर्थ ठरली. ज्या नातूवर तिचा विश्वास होता त्याच नातूने तिचा विश्वास तोडून तिचा उशीने गळा दाबण्यास सुरुवात केली. तिला ओरडण्याची संधी न देता त्याने तिला देवाघरी पाठवले. ती मरण पावताच त्याने पुर्ण ताकदीनिशी तिच्या डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे काढून घेतले. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या त्याने जणूकाही ओरबाडूनच घेतल्या. घराचा दर्शनी दरवाजा आतून बंद करुन घेतल्यानंतर त्याने हा सर्व प्रकार केला. कुणाला काही समजण्याच्या आत त्याने तिचा मृतदेह एका पोत्यात भरुन तोएका कोप-यात ठेवून देत मागच्या दरवाजाने पलायन केले. रात्रीच्या अंधारात आजीचा मृतदेह अज्ञात स्थळी फेकून देण्याचा त्याचा विचार होता.

दरम्याननेहमी नजरेसमोर दिसणारी मंजाबाई दिसत नसल्यामुळे सायंकाळी गावात राहणारा मंजाबाईचा मावस नातू गोविंद पुंडलीक भोई आणि इतर नातेवाईक आजीची भेट घेण्यासाठी आले. मात्र मंजाबाईच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे सर्वांनी आजीला हाका मारण्यास सुरुवात केली. मात्र तरीदेखील आतून आजीने प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ दार ठोठावून, हाक मारुन देखील आजी मंजाबाई प्रतिसाद देत नसल्याचे बघून बाहेर उभे असलेले सर्व नातेवाईक हैरान झाले.

त्यामुळे गोविंद भोई, समाधान भोई आणि इतर समाज बांधवांनी मंजाबाईच्या घराच्या मागील दरवाजाने आत प्रवेश केला. आत प्रवेश केला असता सुरुवातीला त्यांना मजाबाई कुठेही दिसून आली नाही. मात्र घरातील एका कोप-यात एक जड पोते त्यांना आढळून आले. त्या पोत्यात त्यांना काहीतरी बांधलेले दिसून आले. त्या पोत्याजवळ जावून ते पोते उघडून पाहिले असता सर्वांना धक्काच बसला. पोत्यात आजी मंजाबाईचा मृतदेह होता. तिच्या कानातील सोन्याच्या बाळ्या आणि डाव्या हाताच्या दंडावरील चांदीचे कडे नव्हते. एकंदरीत प्रकार बघून सर्वजण मनातून पार घाबरले.

मंजाबाईचा मावस नातू समाधान पंडीत भोई याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन गाठले. त्यावेळी सहायक फौजदार अरविंद मोरे हे ठाणे अंमलदार म्हणून नेमणूकीस होते. समाधान भोई याने घाबरलेल्या अवस्थेत अरविंद मोरे यांची भेट घेतली. गावातील मुल्लावाडा परिसरात राहणारी आजी मंजाबाईचा मृतदेह गोणपाटात बांधलेला असून कुणीतरी तिचा खून केला असल्याची माहिती समाधान भोई याने सहायक फौजदार अरविंद मोरे यांना दिली.

समाधान भोई याने दिलेली माहिती ठाणे अंमलदार अरविंद मोरे यांनी प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अमोल भिवसन पवार यांच्या कानावर टाकली. घटना गंभीर असल्यामुळे अजिबात वेळ न दवडता स.पो. नि. प्रकाश काळे, पोलिस उप निरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ.रणजीत पाटील, पो.कॉ.जितेंद्र पाटील, पोकॉ.प्रशांत पाटील, पोकॉ.अभिजीत निकम, चालकपोलिसनाईकदिपक आहीरे असे सर्वजणशासकीय वाहनाने मुल्लावाडा परिसरातील मंजाबाई रहात असलेल्या घराच्या घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी नातेवाईकांची तोबा गर्दी जमली होती. पोलिसांचे पथक आल्याचे बघून अनेक नातेवाईक बाजूला झाले.

गोविंद पुंडलीक भोई याने पुढाकार घेत सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांना आपली ओळख करुन दिली. मयत मंजाबाई ही नात्याने गोविंद भोई याची मावस आजी होती. आजी मंजाबाई भोई त्यांच्या घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे नातेवाईकांनी मागील दरवाज्याने आत प्रवेश केल्यानंतर सर्वांसमोर खरा प्रकार उघडकीस आला होता. तशी सविस्तर माहिती पोलिस पथकाला देण्यात आली.

पोलिस पथकाने आत गेल्यावर त्यांना देखील घराच्या एका कोप-यात मंजाबाईचा पोत्यात बांधलेला मृतदेह आढळून आला. तिच्या डोळ्यांना मुंग्या लागलेल्या होत्या. तिच्या डाव्या दंडावरील चांदीचे कडे व कानातील सोन्याच्या बाळ्या कुणीतरी काढून घेतल्या होत्या.

दरम्यान कुणीतरी 108 क्रमांकाच्या अॅं्म्ब्युलंसला फोन करुन घटनास्थळी बोलावले होते. अॅंरम्ब्युलंस आल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी ग्रामिण रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयत मंजाबाईच्या नातेवाईकांना पोलिस स्टेशनला बोलावून कुणीतरी तक्रार देण्यास पुढे यावे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे व पोलिस उप निरीक्षक अमोल पवार यांनी केले. मात्र कुणीही नातेवाईक या घटनेप्रकरणी तक्रार देण्यास पुढे आला नाही. त्यामुळे सरकारतर्फे फिर्यादी होत पोलिस उप निरीक्षक अमोल पवार यांनी मंजाबाई दगडू भोई या वयोवृद्ध महिलेच्या खून प्रकरणी अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 108/2024 भा.द.वि. 302, 397,452 प्रमाणे दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकामी तिन पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. तपासादरम्यान खब-यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातून पसार झालेल्या विशाल भोई याच्या डोक्यावर सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचे कर्जअसल्याची माहिती स.पो.नि. प्रकाश काळे व त्यांच्या तपास पथकाला समजली. या माहितीच्या आधारे संशयाचीसुई गावात अनुपस्थित असलेल्या विशाल भोई याच्यावर स्थिरावली. घटनास्थळ असलेल्या मुल्लावाडा परिसरात असलेल्या मशिदीवर सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही फुटेजमधे संशयीत विशाल भोई हा आजी मंजाबाईच्या घरात जातांना दिसून आला मात्र घरातून बाहेर आल्याचे दिसत नव्हते.तो आजीच्या घराच्या मागच्या दरवाजाने केव्हाच पसार झाला होता.

शिताफीने तपास करत असतांना संशयीत विशाल भोई यास पकडण्यात पोलिस पथकाला यश आले. त्याला सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र स.पो.नि. प्रकाश काळे यांच्या करड्या आवाजापुढे तो फार वेळ खोटे बोलू शकला नाही. त्याने आपला गुन्हा कबुल केला. आपल्यावरील कर्ज संपवण्यासाठी आपण आजी मंजाबाईलाच उशीने गळा दाबून संपवल्याची कबुली त्याने दिली. आजीच्या मृतदेहाची विल्हेवाट रात्रीच्या अंधारात लावण्याचा त्याचा विचार होता. मात्र त्यापुर्वीच काही तासात पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले.

आजीच्या दंडावरील चांदीचे कडे आणि कानातील बाळ्या त्याने अजिंठा येथील एका सराफाला विकल्याची त्याने कबुली दिली. आजीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह गोणपाटात बांधून घराच्या मागच्या दरवाजाने आपण पलायन केल्याचे देखील त्याने कबुल केले. तपासादरम्यान आजीचे कानातील बाळ्या आणि चांदीचे कडे हस्तगत करण्यात आले. सराफाकडून मिळालेल्या रकमेतून त्याने कर्जाची गहाण ठेवलेली गाडीसोडवल्याचे देखील विशालने कबुल केले.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांच्यासह त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अमोल पवार, पोलिस उप निरीक्षक परशुराम दळवी (पाचोरा पोलिस स्टेशन), हे.कॉ. रणजीत पाटील, शांतीलाल पगारे, रविंद्रसिंग पाटील, पो.कॉ. जितेंद्र पाटील, अभिजीत निकम, चालक पोलिस नाईक दिपक अहिरे, पंकज सोनवणे, प्रशांत पाटील, अमोल पाटील आदींनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.त्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पिंपळगाव पोलिस स्टेशनचे स.पो.नि. प्रकाश काळे व त्यांच्या सहका-यांचा प्रशस्तीपत्र देत सत्कार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याचा संयुक्त समांतर तपास केला. त्यात सहायकफौजदार विजयसिंग पाटील, हे. कॉ. लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी आदींनी तपासकामी सहभाग घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button