दाखवले जाते लग्नाचे आमिष, घातला जातो गंडा नवरदेवांना फसवणा-या टोळीचा हा लुटारु फंडा
अहमदनगर : लग्न करण्यास इच्छुक असणा-या भावी नवरदेवांना फसवणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट सध्या महाराष्ट्रात झाला आहे. वयाची तिशी-चाळीशी ओलांडूनही होतकरू तरूणांचे लग्न होत नसल्याने ही लग्नाळू मंडळी या टोळ्यांना बळी पडत आहेत. विशेषतः यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरूणांची संख्या मोठी आहे. वय झालं तरी लग्नाला मुलगी मिळत नसल्याने अशा तरूणांबरोबरच त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. ही दुखरी नस बघूनच या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला या टोळीतील लोक लग्नाळू तरूणांचा वधू-वरसंशोधन मंडळ, लग्न जमवणाऱ्या मंडळामार्फत एवढंच नाही तर ठिकठिकाणी त्यांचे एजंट पेरून मासे गळाला लावले जातात. नैसर्गिक असमतोलच याला जबाबदार आहे.
काही वर्षापूर्वी आपल्या देशात विशेषतः आपल्या राज्यात मुलीचे लग्न करून देतांना तिचे आई-वडील, मामा व इतर नातेवाईक स्वखचनि सर्व विवाह सोहळा (कन्यागती) करून देत असत. याउलट मुलीच्या संसारासाठी हातभार लागावा म्हणून संसारोपयोगी वस्तू, एवढेच नाही तर दुभती गाय वा म्हैस देत असत. कालांतराने याच देवाण-घेवाणीचे रूपांतर हंड्यात कधी झाले ते कळलेच नाही. ज्या कुटुंबात मुले आहेत, ती चांगली शिकली असतील, त्यांना चांगली नोकरी व व्यवसाय असेल त्यावर त्यांचा हुंडा ठरत असे. याबाबत हुंडाविरोधी कायदाही करण्यात आला, मात्र त्यालां समाजाचा फारसा प्रतिसाद न मिळाल्याने त्याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली नाही, मात्र १९७० ते २०१० या कालावधीत अनेक मुलींना माहेरहून पैसे व वस्तू आणाव्यात म्हणून आपले प्राण गमवावे लागले. हुंड्यापायी कोणाला जाळून, कोणाला विष पाजून तर कोणाला विहीरीत ढकलून देण्यात आले.
बऱ्याचदा विवाहितेच्या छळाची एखादी तरी बातमी असल्याशिवाय त्या वर्तमानपत्राची पाने पूर्ण होत नाही. विपरित परिणाम झाला की आपल्या कुटुंबात आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा विविध भूमिका बजावणाऱ्या मुलीचा गर्भ पाडण्याचे षडयंत्र गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. बहुसंख्य हॉस्पिटलमध्ये रिसेप्शन कक्षात समोरच्या भिंतीवर येथे गर्भचिकित्सा केली जात नाही. गर्भचिकित्सा करणे कायद्याने गुन्हा आहे वगैरेचे ठळक बोर्ड लावले जातात. अशाच हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा चोरी-छुपे मोठमोठ्या रक्कमा घेवू गर्भ पाडले जातात. या घटना अनेकदा उघड झाल्या आहेत. मुलींचे गर्भ पाडून मुलांचेच गर्भ वंशाचा दिवा म्हणून ठेवण्यात आल्याने मुलींची संख्या कमी झाली आहे. धक्कादायक बाब ही आहे की पुरोगामी महाराष्ट्रातील पुढारलेल्या जिल्ह्यांमध्ये दर हजारी मुलींची संख्या ८५०- ९०० इतकीच आहे. राहिलेल्या मुलांसाठी मुली आणायच्या कुठून? मुला-मुलींच्या संख्येचा नैसर्गिक समतोल बिघडल्याने चांगल्या घरातील शेतकरी, व्यवसायिक कुटुंबातील मुलांना मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.
साधारण ५० ते ७० या वयोगटातील वाचकांना आठवत असेल की नव्वदच्या दशकात उच्चशिक्षीत नाशिक येथील शरद सारडाने त्याची उच्चशिक्षीत पत्नी मंजुश्री सारडा हिला पोटॅशियम सायनाईड देवून मारले होते. हुंड्याची दाहकता म वाढल्याने स्त्री भ्रूण हत्येत वाढ झाली. त्याचा परिपाक म्हणजे म आज बहुतेक सर्व समाजात मुलांची वय उलटून गेली तरी लझे होत नाहीत. याउलट मुलगी शिकली प्रगती झाली या न्यायाने मुली उच्चशिक्षण घेवून आय.टी. तसेच विविध क्षेत्रात चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या करू लागल्याने त्यांच्या अपेक्षा बाढल्या आहेत. मुलाला लठ्ठ पगाराची नोकरी हवी. पुणे- मुंबईसारख्या शहरात फ्लॅट हवा. शेती हवी, गाडी हवी. या अवास्तव मागण्या वाढल्याने चांगल्या मुलांची लग्ने झाली नाहीत. एक तर ते या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत आणि कुठं तरी, काहीतरी करून लग्न जमवायचा प्रयत्न करावा तर फसवणूक होण्याची शक्यता जास्त वाढली आहे. मुला-मुलींच्या विषमतेने संपूर्ण विवाह संस्था धोक्यात आली. अशाच एका टोळीचे बळी ठरलेले श्रीगोंद्याचे उगले कुटुंबीय मात्र जरासे सावध असल्याने जीबाबर आले ते बोटावर निभावले. लोकांना फसवून नववं लग्न करणाऱ्या सिमरन पाटीलच्या तावडीतून नितीन अशोक उगलेची सुटका झाली, अन् दोन महिलांसह सात जणांची टोळी श्रीगोंदा पोलिसांच्या हाती लागली.
अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथे अशोक उगले हे शेतकरी पत्नी लंकाबाई, मुलगा नितीन याच्यासह रहातात. त्यांना उषा नावाची मुलगी असून ती विवाहित आहे. तिचे लग्नानंतरचे नाव उषा सचिन मेटे असे आहे. अशोक उगले यांचा मुलगा नितीन (वय ३१) याचे लग्न जमत नसल्याने ते काळजीत होते. पूर्णतः शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या उगले कुटुंबीयाला नितीनच्या विवाहाची काळजी सतावत होती. दरम्यान त्यांनी त्यांच्या शेती कामाच्या मदतीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आरणी येथील राजू राठोड याला ठेवले होते. नितीनचे लग्न जमवण्यासाठी उगले कुटुंबीयांची होणारी तगमग बघून राजूला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटत होती म्हणून त्यानेही विचार केला की आपल्या ओळखीने मालकाच्या मुलाचे लग्न झाले तर तेवढेच आपल्याला पुण्य मिळेल म्हणून तो मालक अशोक उगले यांना म्हणाला, ‘मालक आमच्या गावात तुमच्या नितीनकरता एक चांगले स्थळ आहे. देखणी मुलगी आहे. सामान्य कुटुंब आहे. बघा तुम्हाला वाटलं तर…’ असं बोलून राजूने हळूच खडा टाकला, तेंव्हा अशोक उगले त्यास म्हणाले, ‘हरकत नाही. तू आमच्यासोबत येत असला तर आपण मुलगी बघून घेऊ.’ अशोक उगले यांनी घरात याविषयी चर्चा केली. राजू राठोड एवढे खात्रीने सांगतो म्हटल्यावर उगले कुटुंबीय मुलगी बघायला जाण्यासाठी तयार झाले.
रविवार दि. २३ जून रोजी अशोक उगले, त्यांचा मुलगा नितीन, मुलगी उषा सचिन मेटे असे सर्व जण राजू राठोडला घेवून गाडीवरून मुलगी बघायला निघाले. दहा-बारा तासांचा प्रवास असल्याने ते भल्या पहाटे मुंगुसगाव येथून निघाले. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चोरंबा येथे दुपारनंतर ते पोहोचले. एका छोट्याशा घरात मुलगी सिमरन गौतम पाटील, तिची आई आशा, भाऊ कर्णव गौतम पाटील असे रहात होते. राजू राठोड उगले कुटुंबाला त्यांच्या घरी घेवून गेला. त्यावेळी त्या घरात इतर दोघे- तिघे जण होते. आपल्या भारतीय परंपरेने नवरी सिमरन पाटील नटून थटून बैठकीत येवून बसली. उगले कुटुंबीयांनी तिला बघितले. अशोक उगले यांनी तिला काही प्रश्न विचारले. तिनेही मोठ्या चपखलपणे उत्तरे दिली. वय १९ वर्षे असलेली चुणचुणीत मुलगी सर्वांना पसंत पडली.
उगले कुटुंबाने आम्हाला मुलगी पसंत असल्याचे सांगितले. दोन्ही कुटुंबाला आनंद झाला. तेवढ्यात मुलीची आई आशा पाटील ही अशोक उगले यांना म्हणाली, ‘आम्ही तुम्हाला मुलगी देतो, मात्र लग्नाचा खर्च तुम्हाला करावा लागेल आणि आम्हाला दोन लाख १५ हजार रूपये द्यावे लागतील. नितीनचे लग्न जमत नसल्याने उगले कुटुंब पैसे द्यायलाही कबुल झाले. एवढी सर्व सांगोपांग चर्चा झाल्याने उगले कुटुंब आता परतीच्या प्रवासाला – निघाले. बऱ्याच उशिरा ते सर्व जण मुंगुसगावला पोहोचले. त्यावेळी सर्वांच्या चेह-यावर समाधान होते. चला आता एकदाचे नितीनचे मार्गी लागले म्हणून सर्व जण खुष होते. जवळच्या काही नातेवाईकांनाही उगले परिवाराने लग्न जमवल्याची कल्पना दिली.
बुधवार दि. २६ जून २०२४ रोजी उगले कुटुंबीय घरी असतांनाच मुलीची आई आशा पाटील, मुलगी सिमरन पाटील, राजू राठोड, त्यांचे इतर दोन संबंधित मुंगुसगाव येथे आले. मुलीच्या आईने सांगितले की आपण आता आपल्या पद्धतीने लग्न करून घेवू. अशोक उगले यांनी घरामध्ये चर्चा केली आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचे ठरले. कोळगाव येथील साकेवाडीतील महादेव मंदिरात लग्न करण्याचे नियोजन करण्यात आले. अशोक उगले यांनी कबुल केल्याप्रमाणे दोन लाख १५ हजार रूपये मुलीची आई आशा पाटील हिच्याकडे दिले. दोन्ही बाजूकडील मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत उगले-पाटील लग्नसोहळा आनंदात संपन्न झाला. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे विवाह सोहळा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २७ जून रोजी नवरदेव-नवरी व काही नातेवाईक पारनेर तालुक्यातील अपधुप येथील खंडोबाच्या दर्शनाला जावून आले. नितीन अन् सिमरन हे दोघे जण आता लवकरच त्यांच्या संसाराला सुरूवात करणार होते. नितीन याने त्याच्या भावी आयुष्याची खूप स्वप्ने रंगबली होती.
दि. २८ जून २०२४ रोजी सकाळी ९ वाजता नितीनची नववधू सिमरन पाटील आणि तिची आई आशा पाटील या दोघीजणी उगले परिवाराला म्हणाल्या, आता विवाह सोहळा छान संपन्न झाला. आपले लग्न झाल्याबाबत आम्हाला गावाकडे नोटरी द्यावी लागते. आपण श्रीगोंद्याला जाऊन नोटरी करूया, त्या असे म्हटल्याने उगले कुटुंबानेही त्याला होकार दिला, मात्र अशोक उगले यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तरीही त्यांनी नोटरी करण्याची तयारी दर्शवली. नितीन, त्याचे बडील अशोक, आई लंकाबाई, सिमरन पाटील, तिची आई आशा पाटील असे सर्व जण मुंगुसगावातून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा येथे कोर्टाच्या गेटसमोरील वकीलाकडे नोटरी करण्यासाठी आले. स्वतःची चार चाकी गाडी रोडकडेला लावून नितीन व त्याचे वडील अशोक उगले नोटरीसंदर्भात वकीलाच्या ऑफिसमध्ये जात होते. त्यावेळी नितीनची आई लंकाबाई, नितीनची नववधू सिमरन, तिची आई आशा पाटील असे सर्व जण गाडीत बसले होते. त्यावेळी अचानक नितीनच्या आईचा ‘नितीन, नितीन… इकडे या’ असा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी नितीन व त्याचे वडील पळतच गाडीकडे आले, तेंव्हा नितीनची आई लंकाबाई हिने सिमरनचा हात पकडून ठेवला होता.
नितीन व तिच्या वडीलांनी काय झाले असे विचारणा केली असता तेंव्हा नितीनच्या आईने सांगितले की तुझी बायको सिमरन ही या या दुसऱ्या गल्लीतून आलेल्या लोकांबरोबर पळून जात आहे. ती असे सांगत असतांनाच आशा पाटीलने लंकाबाईच्या डोळ्यात तिच्या जवळची मिरची पावडर फेकली. तेवढ्यात प्रसंगावधान राखून नितीन याने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या कानावर घडलेली घटना घातली, तेंव्हा पोलीस निरीक्षक भोसले यांनी शहर बीटाचे हवालदार मुकेशकुमार बडे यांना तात्काळ घटनास्थळावर रवाना केले.
लंकाबाईचा आरडाओरडा ऐकून कोर्टाजवळील बरेच लोक तेथे जमा झाले. इर्टिगा गाडीतून आलेल्या लोकांना सगळ्यांनी विचारले, ‘तुम्ही कोण, कशासाठी आले? त्यावेळी त्यांनी सांगितले की, आशा गौतम पाटील हिने आम्हाला फोन करून तुम्ही आम्हाला घेवून जाण्याकरता श्रीगोंदा येथे या असे सांगितले होते, म्हणून आम्ही यवतमाळ येथून इर्टिंगा गाडी घेवून आलो आहोत. त्या सर्वांना हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या गाड्यांसह पकडून पोलीस स्टेशनला आणले. आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील या महिला सूत्रधारांसह पोलिसांनी शेख शाहरूख शेख फरिद, दिपक पांडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील सर्व नरा. घाटंजी, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले. नितीन न उगलेची जागरूक आई लंकाबाई यांच्या प्रसंगावधानतेमुळे नवरदेवांना फसवून लुटणारी आंतर राज्य टोळी श्रीगोंदा पोलिसांच्या हाती लागली होती.
उगले कुटुंबाचा मोठा घात होता होता राहिला होता. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी तातडीने वरीष्ठांना दिली. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे, त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल प्रविण गारूडकर, आनंद मैंड, संभाजी गर्डे, महिला कॉन्स्टेबल अरूणा खेडकर, अस्मिता शेळके यांनी कसून तपासास सुरूवात केली.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील गोरंबा येथील रहिवासी असलेली आशा गौतम पाटील (वय ३८) हिचा पती गौतम याचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. तिला सिमरन (वय १९), अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील ही दोन अपत्ये. ऐन तारूण्यात पदार्पण केलेली आशा पाटीलची मुलगी सिमरन हिच्या भांडवलावर या टोळीने गेल्या काही वर्षापासून हा गोरखधंदा सुरू केला आहे. नवरी मिळवून देतो असे म्हणवून लाखोंना लुटण्याचे या टोळीची हे नववे प्रकरण होते. थोडक्यात नितीन उगले हा त्यांचा नबवा बळी होता. त्यानंतर त्यांना बुऱ्हाणपूर येथे दोन कुटुंबांना गंडवायचे होते, मात्र मध्येच त्यांचा गेम झाल्याने लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांची बेडीच त्यांच्या हातात पडली.
श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील नितीन अशोक उगले (वय – ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी आशा पाटील, सिमरन पाटील, शेख शाहरूख शेख फरीद, दिपक देशमुख, कर्णन पाटील, राजू राठोड, युवराज जाधव या सात जणांविरूद्ध गुन्हा रजि. नं. ६३०/२०२४ भा.दं. वि. ४२०, ३३६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यातील राजू राठोड व युवराज जाधव वगळता इतर सहा जणांना तात्काळ अटक करून त्याच्याकडून चार चाकी गाडीसह रोख २२ हजाराची रक्कम जप्त करण्यात आली. सर्व संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सर्व सहा संशयितांना श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस पथकाने सिमरन पाटील व आशा पाटील यांना सोबत घेवून यवतमाळ जिल्ह्यात तपास केला असता स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक उंबरकर यांनी सहकार्य केले. पोलिसांनी युवराज जाधव व राजू राठोडला ताब्यात घेतले आहे. आशा पाटीलच्या या टोळीने आत्तापर्यंत महाराष्ट्रासह राजस्थान आदी चार राज्यांमध्ये गुन्हे केले आहेत. श्रीगोंदा पोलिसांना आरोपी अटक करण्याकामी घाटंजीचे नगराध्यक्ष सुरज हेमके, सामाजिक कार्यकर्ते हितेश ठाकूर, सुरेश जाधव आदींनी सहकार्य केले.