ईव्हीएममध्ये घोटाळाच, भाजपच्या जुन्या सहकाऱ्याचा आरोप
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जोरदार मुसंडी मारत अपेक्षापेक्षा जास्त जागा मिळवल्या. तसेच निवडणुकीच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मतदानाचा टक्का अचानक वाढला. त्यावरून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ईव्हीएमच्या घोटाळ्यावरून आता महायुतीचे जुने सहकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला आजिबात पडायचं नाही. पण अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप महादेव जानकर यांनी यावेळी केला.
महादेव जानकर यांनी सांगितले की, ‘ईव्हीएमवर माझा आक्षेप असून देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहे. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. ईव्हीएम हॅक करता येत. मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहिती आहे.’, तसंच, ‘सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही.’, असे मत त्यांनी व्यक्त केले.