क्राइम

धुळे शहरात एकाच कुटूंबातील चौघांची आत्महत्या

धुळे: शहरात एका कुटूंबियांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीने आपल्या दोन मुलांसह हे टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नसून एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आमच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरु नका असे लिहिले आहे. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आराेप नातेवाईकांनी केला आहे.

प्रवीण गिरासे आणि दीपा गिरासे या दाम्पत्याने आपल्या मितेश आणि सोहम या दोन लहान मुलांसह आयुष्याची अखेर केली होती. प्रवीण गिरासे यांची बहीण गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी आली तेव्हा घराचा दरवाजा वरच्यावर लावला होता. तसेच घराच्या आजुबाजूला दुर्गंधी येत होती. तिने दरवाजा उघडला तेव्हा पहिल्या मजल्यावर प्रवीण गिरासे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तर बेडरुममध्ये गिरासे यांची पत्नी दीपा आणि मितेश व सोहमचा मृतदेह होता. या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. गिरासे कुटुंबाने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

पोलिसांनी गिरासे यांच्या घराची झडती घेतली तेव्हा प्रवीण गिरासे यांच्या मृतदेहाच्या बाजूला पोलिसांनी एक सुसाईड नोट आढळून आली. यात आम्ही सर्वजण आत्महत्या करीत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही सुसाईड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

गिरासे कुटुंबीयांचा मृत्यू घातपातामुळे?
प्रवीण गिरासे यांनी आपल्या शेजाऱ्यांना मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरासे कुटुंबीय कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. मंगळवारपासून त्यांचा दरवाजा बंदच होता. घरातील चारही मृतदेह कुजायला लागल्यानंतर त्याची थोडीफार दुर्गंधीही पसरली होती. प्रवीण गिरासे यांनी आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही असे सुसाईड नोटमध्ये सांगितले असले तरी त्यांच्या नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

प्रवीण गिरासे व त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रवीण गिरासे यांचे लामकानी, तसेच धुळे शहरात खते बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच नितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते. नितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता.

तर दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांचे कुटुंब आत्महत्या करूच शकत नाही. त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button