
घरात घुसून शिक्षक, पत्नी अन् दोन लहानग्यांना गोळ्या घालून हत्या
लखनऊ: घरात घुसून सरकारी शिक्षक, त्यांची पत्नी आणि दोन मुलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे आरोपींनी घरात घुसून कुटुंबाची हत्या केली आहे. या कुटुंबाची हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला.
शिक्षकाच्या पत्नीनं १८ ऑगस्टला रायबरेलीतील चंदन वर्माच्या विरोधात छेडछाड आणि मारहाणीची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या तक्रारीवरुन चंदनविरोधात गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.
पूनम, तिचा पती सुनील कुमार आणि त्यांच्या लहान मुलांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे चौकोनी कुटुंब शिवरतनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहोरवा भवानी परिसरातील चौकात भाड्याच्या घरात वास्तव्यास होतं. सुनील कुमार पीएमश्री विद्यालयात सहायक अध्यापक होते. गुरुवारी संध्याकाळी काही अज्ञात बंदूकधारी त्यांच्या घरात पोहोचले. त्यांनी सुनील कुमार यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर बेछूड गोळीबार केला. त्यात सुनील कुमार, त्यांच्या पत्नीसह पाच आणि दीड वर्षांच्या लेकींचा मृत्यू झाला.
मृत शिक्षकाच्या सासूने आरोपी चंदन वर्मावर गंभीर आरोप केले आहेत. मृत पूनमच्या आईने सांगितले की, चंदन आपल्या मुलीला आधीच त्रास देत होता. तो गावातील लोकांना माझ्या मुलीला मारण्याची धमकी द्यायचा. विनयभंग प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी चंदनही दबाव टाकत होता. कारागृहात जाण्यापूर्वी त्याने खुनाची धमकीही दिली होती.
दुसरीकडे, सुनीलच्या वडिलांनी आरोपी चंदनविरुद्ध तक्रार दाखल केली असून, त्या आधारे भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी सुनील कुमार आणि चंदन वर्मा यांच्यात वाद झाला होता. वादाच्या वेळी त्यांची सून पूनमही उपस्थित होती. या वादातून चंदन वर्माने गुरुवारी सायंकाळी मुलगा, पत्नी आणि दोन नातवंडांची हत्या केली.
अमेठीतील या भीषण हत्याकांडाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दखल घेतली आहे. आरोपींनी कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ नये, अशा सक्त सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. त्यानंतर स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त यूपी एसटीएफची अनेक टीमही आरोपी चंदनच्या शोधात व्यस्त आहेत. काल रात्रीच अमेठी पोलिसांनी चंदन वर्माच्या रायबरेली येथील घरावर छापा टाकला होता, मात्र तो तेथे सापडला नाही. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा अमेठी पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली मृत कुटुंबाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
सुनील कुमार यांच्या घरात काही अज्ञात शिरले होते. त्यांच्याकडे २ बंदुका होत्या. त्यांनी ९ गोळ्या झाडल्या. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला. सुनील अतिशय मेहनती आणि हुशार होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं सुरुवातीला ते वीट भट्टीत काम करायचे. मनरेगामध्ये काम करुन त्यांनी दुकान सुरु केलं. सोबत अभ्यासही सुरु ठेवला. त्यांनी पोलीस दलात वर्षभर नोकरी केली. तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यानंतर त्यांनी सरकारी शिक्षक होण्याचा निश्चय केला. त्यातही ते यशस्वी ठरले.
घटनेची माहिती मिळताच अमेठीचे एसपी अनुप सिंहही घटनास्थळी पोहोचले. एसपींनी पोलिसांचे पथक तयार करुन आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएम योगी यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. योगी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.