Crime Story : ते दोन मामा रात्री आले अन् आजीचा गळा दाबून निघून गेले… चिमुरडीमुळे उघड झाला आजीच्या हत्याचा प्रकार

नागपूर : सासूच्या सततच्या टोमण्याला वैतागलेल्या सुनेने आपल्या चुलत भावाच्या मदतीने हत्या केली. नंतर सासूला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा बनाव केला. पण सासूच्या नातेवाईकांना याचा संशय आला. त्यांनी चौकशी केली असता नातीने सांगितलेली माहितीने नातेवाईक हादरून गेले. त्या रात्री ते दोन मामा घरात आले अन् आजीचा गळा दाबून निघून गेले. याप्रकरणी सुनेसह ितच्या चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना नागपूरातील आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मित्र नगरमध्ये 52 वर्षीय सुनिता राऊत राहत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 32 वर्षीय सून वैशाली राऊत आणि आणखी एक व्यक्ती राहत होती. दोघींच्या नवऱ्यांचे निधन झाले असून आरोपी वैशाली, सासू सुनिता राऊत यांच्यासोबत राहत होत्या. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती आणि घरातील भाडेकरूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.
दरम्यान 28 ऑगस्टला सासू सुनिता यांची हत्या झाली. पण त्यांचा मृत्यू हृद्यविकाराच्या झटक्यामुळं झाल्याचा बनाव त्यांच्या सुनेने रचला. त्यामुळे ही घटना उघडकीस यायला दहा दिवस लागले. हा हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू नसून हत्या असल्याचं रविवारी 8 सप्टेंबरला उजेडात आलं. त्यानंतर अजनी पोलिसांनी सून वैशाली राऊतसह तिच्या दोन चुलत भावांना अटक केली आहे.
वैशालीचं बाळ लग्नाआधीचं असल्याचा आरोप करत सासू नेहमी चारित्र्यावरून त्यांना बोलायची. तसंच मुलीला आम्ही सांभाळू तू घरातून निघून जा असंही सतत तिला म्हणायच्या. सासूच्या अशा बोलण्याला कंटाळूनच सून वैशालीनं त्यांना संपवायचं असं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशाील पांढुर्णा इथं राहणारा त्यांचा चुलत भाऊ श्रीकांत हिवसेची मदत घेतली.
सुरुवातीला श्रीकांत हत्येसाठी तयार नव्हता. पण, वैशालीनं त्याला 2 लाख रुपये देते असं सांगितलं. हळूहळू तिनं भावाला ऑनलाईन पैसे पाठवायला सुरुवातही केली. एवढंच नाही तर, तू माझ्या सासूच्या हत्येची सुपारी घेतली नाही तर, मी तुझ्या नावाने पत्र लिहून आत्महत्या करेन, अशी धमकीही तिनं भावाला दिली होती. त्यामुळं श्रीकांतनं एका साथीदाराला सोबत घेऊन सुनिता यांच्या हत्येचा कट रचला.
हत्येचा कट महिनाभरापासून रचला जात होता. फोनवरून त्यांनी सगळंकाही ठरवलं. त्यानुसार श्रीकांत आणि त्याचा साथीदार दोघं 27 ऑगस्टला घरी येऊन पाहणी करून गेले. ठरल्याप्रमाणे वैशालीनं 28 ऑगस्टला रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर श्रीकांत आणि त्याच्या साथीदारानं घरात येऊन रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुनिता यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दोघेही निघून गेले.
वैशालीनं दुसऱ्या दिवशी सासूचा रक्तदाब वाढल्यामुळं हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव रचला. नातेवाईकांनाही त्यावेळी त्यावर विश्वास बसला. पण, मृत सुनिता यांच्या चेहऱ्यावर मारल्याचे लाल डाग दिसत होते. त्यामुळं काही नातेवाईकांना संशय आला. त्यांनी मृत सुनिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे फोटो काढून ठेवले.
सुनेवर संशय बळावल्यानं त्यांनी लहान मुलीला विचारपूस केली. त्यावेळी दोन मामा रात्री आले होते असं तिनं सांगितलं. शेजाऱ्यांनीही सासू-सुनेची कडाक्याची भांडणं व्हायची अशी माहिती सुनिता यांच्या नातेवाईकांना दिली. त्यामुळं नातेवाईकांचा संशय आणखी बळावला. नातेवाईकांनी वैशालीच्या नकळत तिचा फोन तपासला. त्यात घटनेच्या आदल्या दिवशी तिनं तिच्या चुलत भावांना सतत फोन केल्याचं दिसलं.
त्यामुळं तिच्यावर पाळत ठेवली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर नातेवाईकांनी रविवारी 8 सप्टेंबरला सकाळी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी वैशालीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पण, तिनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 28 ऑगस्टला माझे भाऊ नाही, तर एका एजन्सीचे कर्मचारी कोलते घरी आले होते, त्याने सासूला मारलं, असा बनाव करत तिनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी तिचा फोन तपासला असता, ती सतत तिचा भाऊ श्रीकांत हिवसेसोबत बोलली असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं घटनेची कबुली दिली.
त्यानंतर मुख्य आरोपी वैशाली, तिचा भाऊ श्रीकांत आणि दुसरा चुलत भाऊ रितेश हिवसेला अटक केल्याचं अजनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी सांगितलं.