Crime Story : शेजाऱ्यांशी रोजचेच भांडण, योगेश होता चिडून! रियाला टाकले विहिरीत, तिचा जीव गेला बुडून!
नाशिक : मालेगाव तालुक्यातील मालेगाव ताहाराबाद रस्त्यावर असलेल्या अजंग गावातील आठ वर्षाच्या बालिकेचे रात्रीच्या वेळी अपहरण करून तिचा निघृणपणे खून केल्याची घटना घडली होती. त्या अजाण बालिकेचा कोणी आणि कशासाठी खून केला असावा? असा संतप्त सवाल विचारला जात होता. या गुन्ह्याचा तपास करावा यासाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोकोही केले होते. अखेरीस या प्रकरणावरचा पडदा बाजूला झाला आणि एका धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. किरकोळ कारणातून होणाऱ्या वादाने एका तरूणाने त्या चिमुकलीवर डूख धरला होता. एकटीला गाठून त्याने तिच्याशी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला, पण ती रडू लागल्याने त्याने तिला विहीरीत टाकून दिले, त्यामध्ये त्या मुलीचा जीव गेला. त्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.
श्रीक्षेत्र चंदनपुरी गावातील रिक्षाचालक ज्ञानेश्वर लालचंद महाले यांची कन्या भाविका उर्फ रिया ही शिक्षणासाठी अजंग येथील प्रशांतनगर येथील निर्मला शेलार यांच्याकडे रहावयास आली होती. भाविका ही मालेगाव येथील भारत विद्यालयात इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. सोमवार दि. १९ मे २०२४ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भाविकाने आजीबरोबर जेवण केले. त्यानंतर आजी निर्मलाबाईंना गावातील एकाकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने रात्री साडेआठ ते पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे पुरणपोळ्या करण्यासाठी निघून गेल्या. तत्पूर्वी त्यांनी भाविका हिला आपल्या घरातील खाटेवर झोपवले. भाविका झोपी गेली. ती घरात एकटीच होती, तर आजी पुरणपोळी करण्यासाठी एकाकडे गेल्या होत्या.
पुरणपोळ्या झाल्यावर आजी निर्मलाबाई या मध्यरात्री एक वाजता घरी परतल्या असता त्यांना घरात भाविका नसल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूला व परिसरात तिचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही, तेंव्हा तिने आरडा-ओरडा करत परिसरात रहाणाऱ्या रामदास गोविंद, केदारनाथ महाले, रूपेश जाधव, पिंटू बोरसे यांना बोलावून घेत आपली नांत भाविका उर्फ रिया ही घरांत झोपलेली होती, पण ती आता कुठे दिसत नाही. ती कुठे गेली काही समजत नाही असे सांगितले, तेंव्हा सर्वांनी भाविका उर्फ रियाचा शोध सुरू केला.
परिसरासह गावामध्ये सर्वांनी भाविका उर्फ रियाला शोधले, मात्र ती मिळून आली नसल्यामुळे भाविकाचे वडील ज्ञानेश्वर महाले यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात इसमाने भाविका या बालिकेचे अपहरण करून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. भाविका मात्र अजूनही सापडली नव्हती. घरात. झोपलेल्या भाविकाला कोणीतरी पळवून नेले होते. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
दोन दिवस भाविका उर्फ रियाचा शोध घेतला जात होता. त्यानंतर अजंग गावालगत मोसम नदीकाठावर असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहीरीत भाविका उर्फ रियाचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. भाविकाचा घातपात झाल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी मालेगाव-ताहाराबाद रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह व वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली.
बालिकेचा मृतदेह विहीरीत खाट टाकून बाहेर काढण्यात आला आणि उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील शासकीय सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आला, नंतर धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व त्यांचे सहकारी करत होते. त्यांनी संशयावरून एकास ताब्यात घेतले.तपास सुरू असतांना यां गुन्ह्याचा तपास कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे देण्यात आला.
पोलिसांनी संशयावरून निर्मला शेलार यांच्या शेजारी रहाणाऱ्या योगेश शिवदास पटाईत या तरूणास ताब्यात घेतले. शेजारी रहाणाऱ्या या दोन कुटुंबामध्ये सतत वाद आणि भानगडी होत होत्या. निर्मला शेलार ही भाविका उर्फ रियाची आजी योगेशला सतत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असे, त्यामुळे योगेश तिच्यावर चिडून होता. इतकेच नव्हे तर भाविकाउर्फ रिया आणि शेजारी रहाणाऱ्या मुलांमध्येही खेळण्यावरून सतत वाद होत होते. या वादाला योगेश पटाईत हा वैतागला होता, त्यामुळे तो भाविका उर्फ व रियाला पाण्यात पहात होता. तिच्याविषयी त्याच्या मनात तिरस्कार व संताप निर्माण झाला होता.
त्यादिवशी सोमवार दि. १९ मे २०२४ रोजी रात्री साडेआठ वाजंता भाविकाची आजी पुरणपोळ्या करण्यासाठी एका व्यक्तीच्या घरी गेल्याचे योगेशने पाहिले होते. भाविका उर्फ रिया ही एकटीच खाटेवर झोपली असल्याचे पाहून त्याने त्याचा मित्र निलेश उर्फ रवि पवार रा. अजंग याला बोलावून घेतले आणि दोघे जण निर्मला शेलार हिच्या घरात घुसले.
खाटेवर निवांत झोपलेल्या भाविका उर्फ रियाला त्यांनी उचलले, तेंव्हा भाविकाला जाग आली आणि ती रडू लागली. त्यावेळी योगेशने तिचे तोंड दाबून धरले आणि तिला दोघे जण मोसम नदीकाठी घेवून आले.
यावेळी योगेशच्या मनात वाईट विचार आले, तसा त्याने प्रयत्न केला असता भाविका उर्फ रिया मोठमोठ्याने ओरडू लागली. तसा तो घाबरला आणि मग त्याने मागचा-पुढचा विचार न करता भाविकाला उचलून विनोद शिरोळे यांच्या विहीरीत फेकून दिले. नाका-तोंडात पाणी जावून भाविका उर्फ रिया विहीरीच्या पाण्यात बुडून मरण पावली, त्यानंतर ते दोघे जण तेथून पसार झाले. दोन दिवसांनी भाविका उर्फ रियाचा मृतदेह विहीरीत तरंगतांना मिळून आला.
ज्ञानेश्वर महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात योगेश शिवदास पटाईत आणि त्याला मदत करणारा निलेश उर्फ रवि पवार या दोघांवर भाविकाचे अपहरण करून विहीरीत टाकून देवून तिचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून दोघांना अटक केली.
दरम्यान योगेश पटाईत याने भाविकाचे अपहरण करून तिला ठार मारल्याचे समजल्यावर काही अज्ञात लोकांनी संतप्त होवून योगेशच्या घराला आग लावून जाळून टाकले. तसा गुन्हा वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात शिवदास पटाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आला. नेहमीच्या होणाऱ्या भानगडीमुळे निरागस बालिका भाविका हिचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.