क्राइम स्टोरी

Crime Story : छेडछाडीची तक्रार अन् मारहाणीने पेटला वाद; संगनमत करून चौकडीने पंकजला केले बाद!

कोल्हापूर : अलिकडे माणसाच्या वागण्याला काही तारतम्य राहिलेले नाही. समाजात जगतांना नीतीनियमांचे पालन कसे करावे याचे भान राहिलेले नाही. कसलीही लाज, भीती, संयम, माणूसकी न बाळगता अत्यंत नीच व उर्मटपणे लोक वागू लागले आहेत. त्याचे परिणाम म्हणजे समाजाचे स्वास्थ हरवत चालले आहे. दोस्त म्हणून एखाद्याच्या घरात गेल्यानंतर त्या घरातील महिलांशी आदराने वागणे हे नीतीला धरून आहे, मात्र काही लोकांना याचे भान नसते. मित्राच्या बहीणीवरही वाईट नजर ठेवणारे नराधम वाढू लागले आहेत. कोल्हापूर शहरातही एका तरूणीने दोन तरूणांविरोधात छेड काढल्याची तक्रार दाखल केली. हे दोघे तिच्या भावाच्या मित्राचे नातेवाईक होते. तिने तक्रार मागे घ्यावी यासाठी तो मित्र तिच्यासह तिच्या भावावर दबाव आणू लागला, पण तिच्या भावाने जुमानले नाही, तेंव्हा छेड काढणारे दोघे आणि मित्र अशा तिघांनी तिच्या भावाला भररस्त्यात ठार केले. समाजात चिंता वाढवणाऱ्या या घटनेचा हा वृत्तांत.

कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट परिसरात रहाणारे पंकज निवास भोसले (वय ३३) यांचे कुटुंब काही वर्षापूर्वी कनाननगरात रहावयास आले होते. त्याच परिसरात किशोर काटे आणि त्याचे बंधू रहातात. एकाच परिसरात पंकज भोसले आणि किशोर काटे यांची कुटुंबे रहात असल्याने पंकज आणि किशोर एकमेकांचे चांगले मित्र बनले होते. दोघेही एकाच दुचाकीवरून नोकरीवर जात असत. कुठे परगावी जायचे असेल तरीही एकाच गाडीवरून जात असत. एखाद्या मित्राची पार्टी असली तरी ते दोघे आपली संगत सोडत नसत. दोघे मिळूनच ते या पार्टीला जात असल्याने परिसरात त्यांच्या दोस्तीबद्दल माहिती होते.

या दोस्तीला एके दिवशी गालबोट लागले. किशोर काटे यांच्या भावकीतील गणेश काटे व विलास काटे या दोघांनी पंकज भोसलेच्या बहीणीची छेड काढली, तेंव्हा तिने शाहुपूरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध तक्रारही दाखल केली. ती तक्रार मागे घेण्यासाठी काटे बंधू पंकजवर दबाव टाकू लागले. यातून वादावाद झाली आणि पंकज भोसले याने गणेश काटे याचा भाऊ उमेश काटे याला बेदम मारहाण केली. याबाबत काटे बंधूनी पंकजवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद केला. या कारणावरून काटे बंधू आणि भोसले यांच्यामध्ये वाद होवू लागले. आता किशोर काटेही पंकजच्या विरूद्ध झाला होता. एकमेकाचे जीवलग मित्र आता एकमेकांच्या जीवावर ते उठले होते. काटे बंधू यांनी पंकजचा गेम करण्याचे ठरवले होते, त्यासाठी त्यांनी योजना आखली. त्यांनी पंकज भोसलेची सगळी इत्यंभूत माहिती घेतली.

पंकज भोसले हा राजारामपुरीतील संबरगे यांच्याकडे कार चालक म्हणून काम करत होता. ही बाब काटे बंधूंना माहिती झाल्यावर गणेश विक्रम काटे व उमेश विक्रम काटे, निलेश विक्रम काटे आणि अमित गायकवाड या सर्वांनी पंकज ज्यांच्याकडे काम करत होता, त्याठिकाणी राजारामपुरीतील संबरगे यांच्या घराच्या बाजूला वाट पहायचे ठरवले. तो दिवस होता मंगळवार दि. २ जुलै २०२४ चा होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पंकज भोसले हा गाडीतून आपल्या मालकांना घेवून त्यांच्या घराजवळ आला. ते पाहून घराजवळच उभे राहिले काटे बंधू त्या गेटजवळ आले. त्यांना पाहून मालकांनी विचारले, ‘काय झाले आहे का?’ त्यावेळी त्यातील एक जण म्हणाला ‘आमचा जुना व्यवहार आहे. तो चुकता करायचा आहे. तुम्ही गप्प घरात जा.’ हे बोलणे चालू असतांना गाडी लावण्यांस गेलेला पंकज तिथे आला.

तो आल्याचे पहाताच त्या सर्वांनी त्याला गेटमधूनच बाहेर ओढले आणि त्याच्याशी बोलत- बोलत ते थोडे अंतर पुढे घेवून गेले. तेवढ्यात त्या चौघांपैकी एकाने पाठीमागून पंकजच्या डोक्यात काठी मारली. त्यावेळी पंकजला संभाव्य धोक्याची जाणीव झाली आणि तो जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. पंकज पळत असल्याचे पाहून या चौघांनीही त्याचा पाठलाग करायला सुरूवात केली. पंकज पळत पळत कर्णिक पथ चौकात आला आणि तो खाली पडला, पण तरीही तो उठून पळण्याच्या प्रयत्नात असतांनाच त्याला उठू न देता त्यांनी त्याला खाली पाडले आणि त्याच्यावर हल्ला चढवला. त एकाने तर त्याच्या छातीवर बसून त्याच्या डोक्यात दगड घातला. तसा पंकज जागीच तळमळू लागला.

दुसऱ्याने दुसरा दगड आणून डोक्यात घातला. तसे तिसऱ्याने तिसरा दगड त्याच्या चेहऱ्यावर मारला, तसा पंकज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला, तरीही एक-एक करून ते चौघेजण त्याला दगड मारत होते.जवळ-जवळ पाच मिनिटे ते त्याला मारत होते. ही धुमश्चक्री बघून एकाने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फोन केला. पोलीस घटनास्थळी यायच्या आत अमित गायकवाड आणि उमेश काटे हे आपली दुचाकी घेवून एका गल्लीतून पळून गेले.

दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि कॉन्स्टेबल अरविंद पाटील तत्परतेने घटनास्थळी पोहोचले. यावेळी गणेश काटे आणि निलेश काटे हे आपली दुचाकी सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, पण ती सुरू होत नसल्याने ते तेथेच अडकले. पोलिसांनी त्या दोघांना लागलीच ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले, तसेच पंकज भोसले याला सीपीआरमध्ये दाखल केले, पण तो मरण पावल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

घटनास्थळावरून पोलिसांनी हल्लेखोर व मृतकांच्या चपला, दगड, रक्ताचे नमुने जप्त केले. घटनेतील दोन संशयित पळून गेल्याने त्यांना पकडण्यासाठी. पथके रवाना केली. त्यांना त्याच दिवशी रात्री उशिरा गडमुडशिंगी येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी हल्लखोरांचे कपडे आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.

पंकज भोसले खून प्रकरणी गणेश विक्रम काटे (वय ३०), उमेश विक्रम काटे (वय २५), निलेश विक्रम काटे (वय २७) आणि अमित गायकवाड (वय ३२) सर्व रा. कनाननगर, कोल्हापूरयांच्याविरोधात गुन्हा रजि. नं. ४३०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३ (५), ३५२, ३५१ (४) प्रमाणे गुन्हा नोंद झाला.

संशयित गणेश विक्रम काटे याच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजि. नं. १९२/२०१९ भा.दं.वि. कलम ३७६, ५०६ प्रमाणे तसेच निलेश उर्फ किशोर काटे याच्याविरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५८/२०१८ भा.दं.वि. कलम ३२४, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद आहे, तर मयत पंकज निवास भोसले याच्याही विरोधात शाहुपूरी पोलीस ठाण्यात ८२९/२०२० भा.दं.वि. कलम ३०७ प्रमाणे व गुन्हा रजि. नं. ३१६/२०२१ भा.दं. वि. कलम १८८, २७० प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, उपनिरीक्षक युवराज जाधव, सचिन चंदन यांनी भेट दिली.या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button