बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींचे धक्कादायक खुलासे
पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामधील दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणामध्ये पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. असं असतानाच अटकेत असलेल्या दोन आरोपींनी काही खुलासे केले आहेत. बालात्कार करण्यापूर्वी त्यांनी काय केलं याबद्दलचा खुलासा केला आहे. तसेच या प्रकरणातील तपासामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केल्याचं दोन आरोपींना अटक केल्यानंतर उघड झालं आहे.
पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आरोपींच्या शोधासाठी 700 पोलीस तैनात करण्यात आल्यानंतर काही दिवसांमध्ये दोन आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने 14 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथून दुसऱ्या आरोपीला अटक केली. हाच या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुणे ते नागपूर, नागपूर ते अलाहाबाद, अलाहबाद ते प्रयागराज असा शोध घेत अखेर उत्तर प्रदेशमधून पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आहे. या मुख्य आरोपीला अटक करण्याआधीच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, बलात्कार करण्यापूर्वी दारु प्यायली होती. मद्यप्राशनाबद्दलची माहिती यापूर्वीच समोर आली होती. मात्र आता या आरोपींनी, ‘आपण गांजाचं सेवनही केलं होतं,’ अशी कबुलीही पोलीस चौकशीत दिली आहे. त्याचप्रमाणे गुन्हा घडल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत पोहचू नयेत याची खबरदारीही या आरोपींनी घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. तांत्रिक तपासामध्ये अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाईल फ्लाइट मोडवर ठेवले होते.
बोपदेव घाट प्रकरणानंतर एका सीसीटीव्हीत तिन्ही आरोपी कैद झाले होते. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यांनंतर येवले वाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून हे तरुण दारू खरेदी करताना दिसून आले. सीसीटीव्हीत ते दारुच्या दुकानात केल्याचं कैद झालं होतं. त्या आधारवर पोलिसांनी आरोपींचे स्केच जारी केलं होतं. नागरिकांना ते आरोपींना माहिती देण्याचं आवाहन केलं होतं. या आधारावर दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.
या प्रकरणात अटक झालेला पहिला आरोपी हा पुण्यातील उंड्री परिसरात राहायला आहे. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींपैकी एकावर तर बलात्काराचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तिन्ही आरोपी परप्रांतीय असून, गुन्ह्यापूर्वी त्यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती यापूर्वीही पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेली. या प्रकरणातील आरोपी अतिशय सराईत असल्याने त्यांनी तांत्रिक तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. कोणताच पुरावा मागे ठेवायचा नाही अशा पद्धतीने त्यांनी यापूर्वीही कायद्याचं उल्लंघन केलं आहे. मात्र पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा उघडकीस आणला. आता या प्रकरणातील नेमका घटनाक्रम पोलीस समजून घेण्याचा प्रयत्न करत असून अटकेत असलेल्या दोघांच्या मदतीने तिसऱ्याला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.