मुंबई | लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारला लाडकी बहीण आठवली. त्यापूर्वी फुटलेले आमदार-खासदार या पलीकडे यांचे कोणी लाडके नव्हते, असे म्हणत ‘मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत’ अशी जोरदार टीका िशवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात सावत्र भाऊ कोणीही नाही. जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे सावत्र भाऊ नाही तर ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचे नुकसान केलं आहे. त्यांनी जेवढं नुकसान केलं तेवढं गेल्या १०० वर्षात कोणीही केलं नाही. आताचे मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत. याआधी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, यांच्याएवढा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत. पण ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांना दिल्ली पायापाशीही उभं करणार नाही”, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.