पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे जीएसटी भवन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढत या अधिकाऱ्यांना चांगले फैलावर घेतले. त्यांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची अक्षरश: भंबेरी उडाली.
अजित पवार हे नविन इमारतीच्या मजल्यावर जात असताना पहिल्याच पायरीवर सिमेंट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते पाहून संतापलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना फैलावर घेतले. हे कशाला झक मारायला ठेवलंय का? हे काय मला काढायला ठेवलं आहे का? असा सवाल अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला. यावेळी अजित पवार चांगलेच संतापल्याचा पाहायला मिळाले.
त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. छाछूगिरी करू नका, ड्रेनेज लाईनचे काम करताना लक्षात नाही आलं का तुमच्या? असा सवाल त्यांनी केला. जीएसटी भवनाच्या नव्या इमारतीत ड्रेनेज लाईनचे झाकण वरती आल्यामुळे अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले होते.
अजित पवार आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जातात. कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल अनेकदा अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली.