…. हे होते बाबा सिद्दीकीचे शेवटचे शब्द
मुंबई : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शूटर्सनी सिद्दिकी यांच्यावर सहा राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांनी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना म्हटलं होतं की, “मला गोळ्या लागल्या आहेत आणि मला वाटत नाही की, मी वाचू शकेन” हेच त्यांचे शेवटचे शब्द असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. गोळीबारानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
सिद्दीकींचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या फुटेजमधून पोलिसांच्या हाती नवीन माहिती लागली आहे. दसऱ्यानिमित्त स्थानिक मंडळाकडून भाविकांना होत असलेल्या मोफत सरबत वाटपाच्या ठिकाणी हल्लेखोरांनी गोळीबार करणाऱ्यापूर्वी अर्ध्या तासाहून अधिक काळ घालवला होता.तसेच तिन्ही हल्लेखोरांनी आपला वेश बदलण्यासाठी प्रत्येकी एक अतिरिक्त शर्ट सोबत ठेवला होता. मंगळवारी, स्थानिक पोलिसांना घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर एक बॅग सापडली आणि त्यातून एक तुर्की पिस्तूल आणि एक शर्ट जप्त करण्यात आला. या आधारे पोलिसांनी गुरनेल आणि धर्मराज कश्यप यांची चौकशी केली असता, दोघांनी सांगितले की, तिघेही जण प्रत्येकी एक अतिरिक्त शर्ट घालून घरातून निघाले होते, जेणेकरून ते घटनेनंतर स्वतःचा पेहराव बदलू शकतील. यासोबतच, शूटआऊटच्या एक दिवस आधी रेकी करताना दुचाकीवरून दोघे जण पडल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळेच बाईकवरुन गोळीबार करण्याचा प्लॅन त्यांनी बदलला.
पोलिसांना त्या बॅगेत अपाचे बाईकची स्लिपही सापडली. ती पुण्यातून ३२ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली होती. ही बाईक हरीश बाळकराम निषाद याने स्वतःच्या कागदपत्रांवर खरेदी केली होती. कारण वयाच्या १५ व्या वर्षापासून तो पुण्यात राहात होता. या कागदपत्रांच्या आधारे त्याेनी कुर्ल्यात घरही भाड्याने घेतले होते.
प्रवीण लोणकरने हरीशला बँकेत ६० हजार रुपये ट्रान्सफर केले होते. आरोपींना सांगण्यात आलं की, शूटआऊटनंतर त्यांना चांगले पैसे तर मिळतीलच, शिवाय सर्वांना सुरक्षित देशात पाठवले जाईल, जेणेकरून पोलिस त्यांना त्रास देऊ शकणार नाहीत.