महाराष्ट्र

“शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय?”, बदलापूर प्रकरणी आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई : अक्षय शिंदेला तळोजा तुरुंगातून बदलापूर येथे ट्रान्झिट रिमांडसाठी नेण्यात येत असताना एन्कांटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याने शेजारी असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकाऊन घेत गोळीबार केला, त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद असल्याची प्रतिक्रिया देत संबंधित शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? असे सवाल देखील उपस्थित केले आहेत. ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, या प्रकरणातील नराधमाला शिक्षा व्हायलाच हवी होती, पण ती कायद्याच्या चौकटीत राहूनच व्हायला हवी होती. बदलापूरच्या नराधमाने जे अमानुष कृत्य केलं होतं, त्याबद्दल त्याला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती. पण आज संध्याकाळी जे घडलं ते हलगर्जीपणाचं आणि संशयास्पद आहे.

या घटनेचा वापर करुन स्वतःची पाठ थोपटून घेणारे, राजकीय स्वार्थ साधू पाहणारे महाभागही आता पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करु पाहणारेही दिसू लागतील, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच, ह्या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? आजच्या घटनेचा आणि ह्या लपवालपवीचा काही संबंध आहे का? असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले आहेत. ह्याची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आणि अपेक्षा देखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, अक्षय शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. याखेरीज त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना त्याने पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी वरील माहितीस दुजोरा दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button